देवरी / संदेश मेश्राम
काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि मराठी पदव्युत्तर विभाग संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांचे विद्यमाने १४ वे राज्यस्तरीय काव्य महोत्सव दि. २३ व २४ डिसेंबर २०२३ ला संत गाडगेबाबा विद्यापीठातील डॉ.के.जी.देशमुख सभागृहात संपन्न झाला. दोन दिवसीय काव्य महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुस्तक प्रकाशने , परिसंवाद, काव्य मैफिलचे आयोजन करण्यात आले होते. सदर काव्य महोत्सवात राज्यभरातील साहित्यिक उपस्थित होते. मुरलीधर खोटेले यांना ‘काव्याकरीता बोलीभाषेचे संवर्धन व उपाययोजना’ परिसंवादातील झाडीबोली विषयांवर भाष्य करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. जया नेरे (अहिराणी) , हणमंत पडवळ ( मराठवाडी) , संदीप वाघोळे (प्रमाण मराठी) ,प्रिया महेकर (मालवणी), हेमा बोंडे (लेवा गणबोली) तर रंजना कराडे (वऱ्हाडी) या बोलीवर भाष्य केले आणि विचार मांडले.
मुरलीधर खोटेले यांनी भाष्य करताना सांगितले की, विदर्भात झाडीबोलीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यात प्राचीन संस्कृतीच्या संस्काराची खूण आढळते. महाराष्ट्रातील स्थानिक भाषांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. झाडीबोलीत निर्माण झालेल्या काव्य निर्मितीवर बोलत या बोलीतील कवी कवयित्रींची ओळख सांगून त्यांच्या बोलीतील योगदानाबद्दल बोलत त्यांच्या रचनाही ऐकवल्या. बोली संवर्धनासाठी बोलीतील साहित्यकृतीला राज्यस्तरावर पुरस्कृत करावे, विद्यापीठांनी बोलीतील संशोधनाला प्रोत्साहन द्यावे, बोलीची संमेलन व्हावीत व शासनाने अनुदान द्यावे. अशी उपाययोजना सांगितली.
या परिसंवादप्रसंगी मा. डॉ. सीमा चिमोटे विभाग प्रमुख पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, साहित्यिक बबन सराडकर, गाडगेबाबा यांचे वंशज प्रवीण जाणोरकर, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, प्रमोद बाविस्कर, कविता कठाणे,वर्षा भांदर्गे, नवनाथ खरात, सारिका दोनोडे, विजया कोरे आणि काव्यप्रेमी शिक्षक मंचचे सर्व विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी व काव्यप्रेमी साहित्यिक उपस्थित होते.