आश्रम शाळेतील विद्यार्थी आता डॉक्टर, इंजिनियर सोबतच वकील होणार

0
101

गोंदिया / धनराज भगत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणतात की एखाद्या समाजाची प्रगती साधायची असल्यास त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. त्यामुळे जर आदिवासी समाजाची प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही हा ध्यास घेऊन प्रकल्प अधिकारी श्री विकास राचेलवार यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ‘मिशन शिखर’ अंतर्गत गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे आज आश्रम शाळेतील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियरच नव्हे तर वकीलही होत असल्याचे दिसून येत आहे.
‘मिशन शिखर’ अंतर्गत आश्रम शाळेतील 32 विद्यार्थी प्रथमच क्लॅटच्या परीक्षेकरीता प्रविष्ट झालेले होते त्यापैकी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल बोरगाव बाजार येथील कु.कल्याणी बलदेव कोटवार व कमलेश भगतसिंग तुलावी तसेच शासकीय आश्रम शाळा जमाकुडो येथील कु. खुशी रमेश वाढीवे या तीन विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे झालेली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेद्वारे होऊ शकलेले नाही ते सर्व विद्यार्थी एमएचटी सीईटी लॉ ही प्रवेश परीक्षा देणार आहेत तेव्हा या परीक्षेमधून सुद्धा काही विद्यार्थ्यांची निवड एलएलबी साठी होऊ शकणार आहे. आश्रम शाळेतील तीन विद्यार्थ्यांना बी.बी.ए. एलएल.बी ला प्रवेश मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे हे यश मिळवण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांनी राबवलेल्या उपक्रमाचे व कार्यपद्धतीचे आदिवासी विकास विभागाकडून व आदिवासी समाजातून कौतुक होत आहे. या उपक्रमाचा अवलंब आता संपूर्ण राज्यात केला जाणार आहे त्यामुळे ही संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. आश्रम शाळेतील इतर विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी आदिवासी विकास विभाग नागपूरचे मा. अपर आयुक्त श्री. रवींद्र ठाकरे यांनी स्वतः बोरगांव येथे भेट देऊन महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे निवड झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला तसेच पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन बाकी विद्यार्थ्यांनी सुद्धा यातून आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.
या परीक्षेसाठी प्रत्येक आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांची आवड व कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यानंतर या विद्यार्थ्यांना CLAT परीक्षेच्या नोट्स पुरविण्यात आल्या तसेच या विद्यार्थ्यांचे सकाळ व सायंकाळी विशेष शिकवणी वर्ग घेऊन परीक्षेची तयारी करून घेण्यात आली. सोबतच परीक्षेची भीती राहू नये म्हणून त्यांच्याकडून सराव पेपर सोडवून घेण्यात आले.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आता नागरी सेवा परीक्षेमध्ये सुद्धा यश संपादन करावे यासाठी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी ‘मिशन टॅलेंट सर्च’ हा उपक्रम सुरू केलेला आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व कौशल्य शिकवले जात असून जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती, महाराष्ट्र टॅलेंट सर्च व नॅशनल टॅलेंट सर्च या परीक्षेची तयारी शाळा स्तरावर करून घेण्यात येत आहे यामुळे लवकरच भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा आश्रम शाळेतील विद्यार्थी सेवा देतील असा विश्वास विकास राचेलवार यांनी व्यक्त केला आहे.

 

“देवरी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या मिशन शिखर या उपक्रमाने एक वेगळाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण केलेला आहे यासाठी देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व शिक्षक यांचे मी अभिनंदन करतो. तसेच याचा आदर्श बाकी प्रकल्प अधिकारी यांनी घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतील यासाठी प्रमाणिक प्रयत्न करावा.”
–  रवींद्र ठाकरे (भा.प्र.से.)
अपर आयुक्त,
आदिवासी विकास नागपूर.

 

“अत्यंत कठीण अशा समजल्या जाणाऱ्या क्लॅटच्या परीक्षेमध्ये आमच्या प्रकल्पातील 3 विद्यार्थ्यांची निवड नागपूर येथील महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी मध्ये होणे ही आमच्या प्रकल्पासाठीच नव्हे तर संपूर्ण आदिवासी विकास विभागासाठी गौरवाची बाब आहे. श्री. बोंतावर यांच्या नियंत्रणाखाली जेईई, नीट आणि आता क्लॅट च्या परीक्षेतील यशापर्यंतच आम्ही मर्यादित न राहता आता नागरी सेवा परीक्षेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे यासाठी सुद्धा आम्ही उपक्रम राबवित आहोत.”

– विकास राचेलवार
प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी.