आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

कृषी महोत्सव शेतकरी, कृषी अभ्यासक व नागरिकांसाठी पर्वणी – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

🏀 आजपासून पाच दिवस गोंदिया जिल्हा कृषी महोत्सव

🏀 225 स्टॉलवर मिळणार माहिती

🏀 कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सव

🏀 विविध विषयांवर चर्चा परिसंवाद

गोंदिया / धनराज भगत

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गोंदिया, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, माविम व कृषि संलग्नीत विभाग, संस्था, यंत्रणा यांचे सहयोगातून 13 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन “मोदी मैदान” टी पाईट जवळ, बालाघाट रोड, गोंदिया येथे केले आहे. कृषी महोत्सव शेतकरी, कृषी अभ्यासक व नागरिकांसाठी पर्वणी असून महोत्सवाची वेळ सकाळी 10.00 ते रात्री 9.00 पर्यंत असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे यावेळी उपस्थित होते.

   महोत्सवाचे उद्घाटन शनिवार 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रफुल्ल पटेल, अशोक नेते, सुनील मेंढे, आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष यशवंत गणवीर, सभापती रुपेश कुथे, संजय टेंभरे, सविता पुराम व पूजा सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

  कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी – विपणन साखळी सक्षमीकरण, समुह गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातुन बाजाराभिमुख कृषि उत्पादनास व विपणनास चालना देणे सदर महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

  सदर महोत्सवामध्ये शासकीय व पौष्टिक तृणधान्य दालन, गृहपयोगी वस्तु दालन, कृषि निविष्ठा दालन, कृषि यांत्रिकीकरण दालन, खाद्यपदार्थ दालन मध्ये एकुण 225 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आत्मा, कृषि विभाग, माविम, उमेद, पोलीस, महसुल विभाग, मत्स्यविभाग, महाबीज, आरोग्य विभाग, कृषि विज्ञान केंद्र, वन विभाग व इतर शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात येणार असुन शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध विभागांच्या योजनांची माहिती  मिळणार आहे. तसेच शेतकरी  गट, माविमचे लोकसंचालित साधन केंद्र व उमेदचे प्रभाग संघामार्फत विविध स्टॉल उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

यामध्ये विविध शेतकरी, शेतकरी गट, माविमचे लोकसंचालित साधन केंद्र व उमेदचे प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत उत्पादित कृषि व कृषि पुरक उत्पादित शेतमालाचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. कृषि महोत्सवाचा कालावधी 05 दिवस असुन यामध्ये 13 जानेवारी  रोजी सकाळी 11.00 वाजता उदघाटन कार्यक्रम व शेतकऱ्यांकरिता भेंडी उत्तम कृषि पध्दत यावर चर्चासत्र, 14 जानेवारी  रोजी सकाळी 11.00 ते 3.00 दरम्यान पौष्टिक तृणधान्य बाबत शेतकरी  शास्त्रज्ञ चर्चासत्र व पाककला स्पर्धा, फळे व भाजीपाला रोपवाटीका व अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र, 15 जानेवारी रोजी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेता संम्मेलन व फळे व भाजीपाला, अंळीबी उत्पादन यावर मार्गदर्शन व चर्चासत्र, 16 जानेवारी  रोजी सकाळी  11.00 ते 2.00 फळे व भाजीपाला, अंळीबी उत्पादन व पिक पध्दती बदल यावर मार्गदर्शन व चर्चासत्र, 17 जानेवारी रोजी  शेतकरी सन्मान समारंभ व जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाची समारोपीय समारंभ असे कार्यकमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 सदर महोत्सवामध्ये शेतकरी, शेतकरी गट, माविमचे लोकसंचालित साधन केंद्र व उमेदचे प्रभार संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, शाळा व महाविदयालयातील विदयार्थी इत्यादी च्या भेटीचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये आयोजित विविध चर्चासत्र, शासकीय व विविध स्टॉलला जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी भेट देऊन आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!