♦️खोदकामामुळे जुना मार्ग बंद, नवीन पुलाचे काम दोन वर्षापासून रखडले!
जिला प्रतिनिधि माइकल मेश्राम
9881664865
सालेकसा;तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पुल मंजूर असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे. बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्याने जुना मार्ग देखील बंद झाला. परिणामी नागरीकांना १ किमी अंतरावर जाण्यासाठी १५ कीमी फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड आक्रोश खदखदत आहे. सदर रखडलेले पुलाचे बांधकाम ७ दिवसाचे आत तत्काळ सुरू करा अन्यथा त्याच ठिकाणी अर्ध जलसमाधी आंदोलन करू असा झणझणीत इशारा भजेपार व बोदलबोडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
भजेपार येथील सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार आणि बोदलबोडी येथील सरपंच देवेंद्र पटले यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून गंभीर समस्येची जाणीव करून दिली असून तत्काळ बांधकाम सुरू करण्यात यावे, सोबतच पर्यायी रस्ता तयार करून देण्यात यावा अन्यथा 17 जानेवारी रोजी पुलाच्या नियोजित ठिकाणी अर्ध जलसमाधी आंदोलन अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान निवेदनाची प्रतीलिपी सालेकसाचे ठाणेदार, तहसीलदार तथा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सालेकसा यांना माहीतीस्तव देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुलाचे भूमिपूजन माजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते त्यांच्या काळात तर सध्याचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते देखील झाले. दोनवेळा भूमिपूजन झालेला हा पुल दोन वर्षापासून रखडलेला असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
सालेकसा आणि आमगाव तालुक्याला जोडणारा भजेपार – बोदलबोडी प्रजीमा-२४ हा महत्त्वाचा मार्ग असून शासन प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मागील दोन वर्षापासून बंद पडून आहे. दरम्यान आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने आतातरी शासन प्रशासनाचे डोळे उघडतील काय? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

