गोंदियात “जाणता राजा” या महानाट्याचा प्रयोग

0
19
1

🌺  महानाट्यासाठी प्रशासनाची तयारी जोरात…

🌺 गोंदियात २१, २२ व २३ जानेवारीला तीन दिवस प्रयोग…

🌺 स्व. इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार महानाट्य…

       गोंदिया / धनराज भगत

गोंदियात प्रशासनामार्फत २१, २२ व २३ जानेवारीला ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रयोग होणार आहे. स्व. इंदिरा गांधी स्टेडियमवर या महानाट्यासाठीच्या आयोजनाची प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तयारीचा नियमित आढावा घेत आहेत. तीनही दिवस रोज सायंकाळी नाट्य प्रयोग होणार असून रसिकांसाठी निःशुल्क प्रवेश असणार आहे.
        इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील हा प्रयोग गोंदिया येथे होत आहे.
        शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा रोमांचकारी प्रसंग ‘जाणता राजा’ महानाट्यामध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. दररोज  सायंकाळी सहा वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जीवंत चित्रण कलाकार सादर करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवेश निःशुल्क :- गोंदिया जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रयोग सर्व नागरिकांसाठी निःशुल्क असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित महानाट्य जिल्हावासियांसाठी सांस्कृतिक पर्वणी असणार आहे. सलग तीन दिवस रोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजे दरम्यान प्रयोग होणार आहे. भव्य रंगमंचावर शिवकालीन इतिहास पाहण्याचा हा योग जिल्ह्यात प्रथमच येणार आहे. नागरिकांनी सहकुटुंब ‘जाणता राजा’ महानाट्य पहावे व इतिहासाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे.