आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

‘जाणता राजा’ महानाट्याचा आज भव्य शुभारंभ

 🚩२१ ते २३ जानेवारी

 🚩रोज सायंकाळी  ते  प्रयोग

 🚩सर्वांसाठी प्रवेश नि:शुल्क

 🚩इंदिरा गांधी स्टेडियमवर अवतरणार शिवकालीन इतिहास

गोंदिया / धनराज भगत

           सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन व गोंदिया जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘‘जाणता राजा’’ या महानाट्याचा रविवार २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे भव्य शुभारंभ होणार आहे. महानाटयाची तयारी पूर्ण झाली आहे. गोंदिया शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून ‘‘जाणता राजा’’ महानाट्य आवर्जून पहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
         पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास खासदार प्रफुल्ल पटेल, खा. अशोक नेते, खा. सुनील मेंढे, आमदार सर्वश्री अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
        इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील हा प्रयोग गोंदिया येथे होत आहे.
         शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा रोमांचकारी प्रसंग ‘‘जाणता राजा’’ मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. २१ ते २३ जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण कलाकार सादर करणार करणार आहेत.
        गोंदिया जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या ‘‘जाणता राजा’’ महानाट्याचा प्रयोग सर्व नागरिकांसाठी निःशुल्क असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित महानाट्य जिल्हावासियांसाठी सांस्कृतिक पर्वणी असणार आहे. सलग तीन दिवस रोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजे दरम्यान प्रयोग होणार आहे. भव्य रंगमंचावर शिवकालीन इतिहास पाहण्याचा हा योग जिल्ह्यात प्रथमच येणार आहे. नागरिकांनी सहकुटुंब ‘‘जाणता राजा’’ महानाट्य पहावे व इतिहासाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व संचालक सांस्कृतिक कार्य सांचालनालय मुंबई विभिषण चवरे यांनी केले आहे.

               

  कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांची पार्कींगसाठी गैरसोय होणार नाही यासाठी 21 ते 23 जानेवारी दरम्यान सुभाष स्कुल न.प. गोंदिया व पार्कींग प्लाझा न.प. गोंदिया या ठिकाणी पार्कींची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांना इंदिरा गांधी स्टेडियमच्या (चौपाटीकडून) गेट नंबर 1 व 2 मधून प्रवेश दिला जाणार आहे.

error: Content is protected !!