Uncategorized

लाखनी येथे संविधान संस्कृती विचार संमेलन थाटात संपन्न

लाखनी – स्थानिक स्वप्नदिप सांस्कृतिक सभागृहात दि.२१ जानेवारी २०२४ रोजी संविधान संस्कृती विचार संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. तीन सत्रात पार पडलेल्या या विचार संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.सुशांतकुमार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इंजि.विकासदादा पटले हे स्वागताध्यक्ष होते. मानवतावादी विचारसरणीच्या सर्व महापुरूषांना विनम्र अभिवादन करून संमेलनाची सुरूवात करण्यात आली. संविधनाचे रंग रूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा या स्वागत गीताने मान्यवरांचे व उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले . आयोजन समीतीतील पदाधिकारींच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांना शाल , प्रशस्ती पत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.  संविधान संस्कृती विचार संमेलनाचे उद्घाटक डॉ. सुशांतकुमार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात भारतीय संविधानाचे महत्व समजावून सांगीतले. भारतीय संविधानामुळेच आपले अस्तित्व आहे. या संविधानाला तडा जाणार नाही याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेतली पाहीजे. जोपर्यंत या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत मग ते कोणत्याही जाती-धर्म-पंथाचे का ना असोत तोपर्यंत संविधानाला धक्का सुद्धा लागणार नाही असे मार्मिक विधान केले. इंजिनीयर विकास पटले यांनी सुद्धा भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले आणि आजच्या समाजाची अधोगती याला आपणच जबाबदार आहोत असे मार्मिक खेद व्यक्त केले.. संविधान बचाव संघर्ष समीतीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर यांनी आपल्या भाषणात सांगीतले की , या देशातील जनप्रतिनिधींनी आपआपसात न भांडता देशविकासाला प्राधान्य दयावे असे आवर्जून सांगीतले.

संविधान संस्कृती विचार संमेलनाच्या पहील्या सत्राचे मार्गदर्शक डॉ.सर्जनादित्य मनोहर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. देशातील आदिवासी , ओबीसी , भटके-विमुक्त व अल्पसंख्यांक यांनी आपला जुना इतिहास आठवून संविधानाप्रती कृतज्ञ असायला हवे. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी फक्त बौद्धांचीच नाही तर समस्त बहुजन समाजाची आहे. जाती ,धर्म व पंथाने भारतीय माणूस एकत्र येवू शकत नाही तर फक्त भारतीय संविधानानेच एकत्र येवू शकतो. पूर्वीच्या काळात धर्मांधतेच्या वणव्यात या देशातील स्त्री भाजल्या जात होती. आता संविधानामुळे ती मोकळा श्वास घेवून उच्चपदस्थ राहून सन्मानाने जीवन जगत आहे. आजघडीला प्रत्येक भारतीय स्त्रीने संविधान संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन केले.

पहील्या सत्राचे संमेलनाध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी (IAS) ई.झेड खोब्रागडे यांनी मार्मिक व्याख्यान दिले. सर्व भारतीयांनी स्वाभीमानी वृत्ती बाळगावी. शासकीय मोफत अन्न योजना जी माणसाला आळशी बनवीत आहे त्याचा धिक्कार करावा. शासनाने घर -घर तिरंगा ऐवजी घर-घर संविधान ही योजना राबवावी तरच तळागाळातील माणसाला न्याय मिळेल. प्रत्येक भारतीय व्यक्तीने संविधानाचे महत्व जाणून आपले हक्क व अधिकार अबाधीत ठेवावे व त्यासाठी संघर्ष करावा तसेच आपल्या संविधान संस्कृतीचे रक्षण करावे असे सांगितले. पहील्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रा.उमेश सिंगनजुडे यांनी मानले.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते डॉ. सविता बेदरकर यांनी महीलांनी आपल्या अधिकाराविषयी जागरूक राहून त्यांना जो मताधिकार मिळाला आहे त्याचा योग्य वापर करण्यासाठी सज्ज व्हावे. ओबीसी महीलांनी स्वाभीमानी बाणा ठेवून जीवन जगण्याच्या मुख्य प्रवाहात यावे व संवीधानालाच दैवत समजून त्याच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे असे परखड मार्गदर्शन केले. महीलांनी एकदा तरी हिंदू कोड बिलाचे वाचन करून संविधान कर्त्याविषयी कृतज्ञता बाळगावी हेही आवर्जून सांगितले.

दुसऱ्या सत्रातील विशेष वक्ते डॉ.प्रकाश राठोड यांनी बहुजन समाजातील रामदासींना धारेवर धरले.या रामदास्यांमुळेच भारताचे संविधान धोक्यात आहे. असे परखड विधान केले.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रातील परीसंवादाचे अध्यक्ष प्रा.अनिल काणेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की , संविधान लागू झाल्यापासून मनुस्मृतीचे प्रत्यक्ष दहन झाले. संविधानाच्या प्रती शासकीय संस्था , महाविदयालयातील विदयार्थी यांना देण्यात यावे. संविधानाप्रती प्रत्येक भारतीयांमध्ये आदर निर्माण व्हायला हवा. पहील्या पानावर राजमुद्रा , सिंधू संस्कृतीतील बैलाचे चित्र आहे.बुद्ध , टिपू सुलतान , राम इ. चे चित्र आहे.संविधानात स्वातंत्र्य , समता , बंधुता हे भ. बुद्ध यांच्या शिकवाणीतून घेण्यात आले आहेत. जनप्रतीनिधींनी अजूनही संविधानासंबंधी जनतेला जागृत केले नाही. जनकल्याणकारी योजना संविधानात नमुद केलेल्या आहेत. भारतीय शासकीय , प्रशासकीय व्यवस्थाही जनतेला संविधानातील कलमांविषयी जागरूक करीत नाही. शिकल्यासवरल्या माणसाला आपल्या मताधिकाराचे महत्व कळत नाही हे त्याचे दुर्दैव आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे भारतीय नागरीकाने वागावे. भारतीयांनी कर्मकांड व अंधश्रद्धेला मुठमाती देवून विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवावा. संविधान संस्कृती राबवीणे ही काळाची गरज आहे हे सांगितले.

संमेलनाच्या तिसऱ्या समारोपीय सत्रात डॉ.चंद्रकांत निंबार्ते यांनी संमेलनातील सर्व वक्त्यांचे विशेष आभार मानून संविधानाच्या रक्षणासाठी सर्व भारतीयांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले. अश्विनी मोहतुरे , अचल मेश्राम, अमृत बंसोड, चंद्रशेखर टेंभूर्णे, किरण ताई कांबळे ,सूर्मिला अशोक पटले, विकास पटले , पृथ्वी रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. भगवान सुखदेवे यांच्या ‘ भारतीय घेटोची अपत्ये ‘ या पुस्तकाचे याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले.  संमेलनाच्या समारोपीय भाषणाच्या वेळी संमेलनाध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की ,संवैधानिक मुल्ये लोकांमध्ये रूजवून त्या मुल्यांची अंमलबजावणी करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा संविधान संस्कृती विचार संमेलनाचा मुख्य हेतू आहे . दुसऱ्या व तिसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.संजय निंबेकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ.रेवाराम खोब्रागडे यांनी केले. संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनातून संमेलनाचा प्रारंभ झाला तर राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप झाला. संमेलनाच्या यशस्वितेसाठी संविधानसंस्कृती विचार संमेलन आयोजन समितीचे पदाधिकारी नरेश ईलमकर (अध्यक्ष), सुरेंद्र बन्सोड (कार्याध्यक्ष) ,डॉ. सुरेश खोब्रागडे (सचिव/ संयोजक) ,अश्वीनी भिवगडे , वि. ग. कांबळे, डॉ. रेवाराम खोब्रागडे ,नामदेव काणेकर, प्रा. उमेश सिंगनजुडे, गोपाल सेलोकर,मृणाल खवसकर ,रोशन खोब्रागडे , योगेश कांबळे , दिलीप भिवगडे , राजूभाऊ गेडाम,शुभम खवसकर व महाप्रज्ञा बुद्धविहार समीतीचे पदाधिकारी वर्षा तिरपुडे , शर्मिला खंडारे , ललीता बडगे , यांनी विशेष सहकार्य केले. लाखनी व आजूबाजूच्या परीसरातील हजारो लोकांनी संमेलनाला उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!