आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम

पं.स.अर्जुनी/मोरगाव येथील नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

        गोंदिया / धनराज भगत

अर्जुनी मोरगाव तालुका दुर्गम, नक्षलग्रस्त व संवेदनशिल आहे. हा तालुका आदिवासी बहुल असून जास्तीत जास्त नागरिक अतिदुर्गम भागात वास्तव्यास राहून शेती करतात. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रदान करण्याच्या दृष्टीने नागरिकांची फारच गैरसोय होत होती. त्यामुळे पंचायत समिती इमारतीचे बांधकाम करणे फारच गरजेचे होते. आज विधीवत सदर इमारतीचे लोकार्पण करण्यात आले असून या इमारतीच्या माध्यमातून नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली पाहिजे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

       पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथे आयोजित पं.स.नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करतांना श्री. आत्राम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.अर्जुनी मोरगाव सभापती सविता कोडापे हया होत्या. आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, तहसिलदार अनिरुध्द कांबळे, जि.प.कार्यकारी अभियंता अतुलकुमार मेश्राम, गटशिक्षणाधिकारी ऋषी मांढरे, महिला व बालकल्याण अधिकारी प्रियंका किरणापुरे, पं.स. अर्जुनी मोरगाव उपसभापती होमराज पुस्तोडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

       पालकमंत्री श्री. आत्राम म्हणाले, गोंदिया जिल्हा हा जंगलव्याप्त जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या पंचायत समिती अर्जुनी मोरगाव ची स्थापना सन 1962 मध्ये झाली. सदर तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रदान करण्याच्या दृष्टीने पंचायत समितीचे जुन्या इमारतीमध्ये फारच कमी विभागांची सोय उपलब्ध होती. काही विभाग इतरत्र विखुरलेल्या इमारतींमध्ये कार्यान्वित  करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची व प्रशासनाची सुध्दा गैरसोय होत होती. नागरिकांची व प्रशासनाची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने नविन प्रशासकीय इमारत बांधकामास सन 2019 मध्ये मंजूरी प्रदान करण्यात आली. सदर इमारतीचे बांधकामास 3 कोटी 70 लक्ष रुपये मंजूर करण्यात येवून सन 2024 पर्यंत सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन आज 25 जानेवारी रोजी या इमारतीचे लोकार्पण करुन नागरिकांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे.

      पं.स.अर्जुनी मोरगाव च्या नविन प्रशासकीय इमारतीमधून विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी योजनांचा एकाच ठिकाणावरुन लाभ देण्यात येणार असल्यामुळे आता नागरिकांना सोईचे झाले आहे. कामे करायला भरपूर संधी आहे. गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाढवून देण्यास आपण प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. महिलांचे सशक्तीकरण करण्याचे महाराष्ट्र शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. पुर्वी पं.स.इमारतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था नव्हती, आता पंचायत समितीच्या नविन इमारतीच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही गैरसोय दूर झालेली आहे.

        सदर पं.स.इमारतीतून नागरिकांची कामे प्रामाणिकपणे करा. काम करीत असतांना अनुभव लागतो, त्यासाठी आपली इच्छाशक्ती असली पाहिजे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विजेची समस्या आहे. 8 तासावरुन 12 तास वीज उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या बळकटीकरणासाठी इको टुरिझम वाढविण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

        आमदार श्री. चंद्रिकापुरे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने 75 वर्षाच्या कालखंडात अर्जुनी मोरगाव येथे पंचायत समितीच्या नविन इमारतीचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले, ही आनंदाची बाब आहे. प्रशासनातील अडचणींवर मात करुन प्रत्येकाने कुशल कामे करुन आपल्या गावाचा सर्वांगिण विकास केला पाहिजे. खंड विकास अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष दयावे. विकासाचा ध्यास समोर ठेवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कामे करावीत. शासन व प्रशासनाने आपसात समन्वय ठेवून कामे केली तर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, बेरोजगार युवकांचे ज्वलंत प्रश्न आहेत. त्यांच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करु असे त्यांनी यावेळी आश्वासित केले.

       यशवंत गणवीर म्हणाले, गोंदिया जिल्हा हा दुर्गम व आदिवासी जिल्हा आहे. झाशीनगर या दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यात प्रतापगड व कचारगड सारखे पर्यटन स्थळ असून ईको टुरिझमच्या माध्यमातून पर्यटनाला वाव देण्यात यावा. जिल्ह्यात शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पालकमंत्री महोदयांनी शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

       अनिल पाटील म्हणाले, लोकांची कामे कशी होतील याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याकडे कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांचा सन्मान करुन लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना सविता कोडापे म्हणाल्या, पं.स.अर्जुनी मोरगाव च्या इमारतीमधून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. या तालुक्यातील शिक्षण विभागातील शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे ती पदे भरण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी अर्जुनी मोरगाव विलास निमजे यांनी केले. कार्यक्रमास जि.प.सदस्य जयश्री देशमुख, सरपंच खोडशिवनी गंगाधर परशुरामकर, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, केवळराम पुस्तोडे, लायकराम भेंडारकर, पोर्णिमा ढेंगे, कविता घाटबांधे, नाजुक कुमरे, नुतन सोनवाने, दानेश साखरे यांच्यासह अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी पं.स.अर्जुनी मोरगाव अनिल चव्हाण यांनी मानले.

error: Content is protected !!