समृद्ध भारत, विकसित भारत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत तसा संकल्पही त्यांनी केला आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सदैव प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण योगदान देईल अशी ग्वाही देतांनाच आपला महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने देशात अव्वल व गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल राहील यासाठी कटिबद्ध होऊ या असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे आयोजित ७४ व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, अर्थ व बांधकाम सभापती योपेंद्रसिंह टेंभरे, समाज कल्याण सभापती पुजा सेठ, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे उपस्थित होते.
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आली, यामुळे हजारो वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले. अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारले जावे हे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न होते ते पूर्ण झाले आहे. ही बाब प्रत्येक भारतीय नागरिकांना अभिमान वाटावी असीच आहे असे पालकमंत्री म्हणाले.
केंद्र सरकारने आदिवासी समाज बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी साडेचार हजार कोटी रुपये निधीची तरतूद केली असून पहिला हप्ता वितरित केला आहे. या निधीतून आदिवासी समाजाची उन्नती होईल व समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आदिवासी भागासाठी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना तयार करून त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेत ग्रामीण आदिवासी भागात रस्त्याचे जाळे तयार होणार आहे. या योजनेचा गोंदिया जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. गोंदिया गडचिरोली समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोली पर्यंत करण्याचा महत्वपुर्ण निर्णयही महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या एका टोकावर असलेल्या आदिवासी बहुल व नक्षल प्रभावीत जिल्ह्याचा गतीने विकास होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे गोंदिया जिल्हा विकासाच्या दृष्टीने समृद्ध होईल अशी खात्री श्री. आत्राम यांनी व्यक्त केली.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, अवकाळी पाऊस, गारपीट आदीच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. सरकारने विक्रमी 44 हजार कोटींची मदत गेल्या दीड वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली आहे. धानाचा बोनस वाढवून हेक्टरी 20 हजार रुपये केला. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहे. दुधाला 5 रुपये प्रतीलिटर अनुदान, महिला सशक्तीकरण योजना इत्यादी लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणारी ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविली आहे. या योजनेत 22 हजार 977 शेतकऱ्यांना 73 कोटी 52 लाख रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस दल अत्यंत उत्कृष्ट काम करीत असून जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त परिसरात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याच्या उद्देशाने “पोलीस दादालोरा खिडकी” हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस दलाचे कौतुक केले.
गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. जिल्ह्यात पणन हंगाम 2023-24 मध्ये जिल्ह्यात 81 हजार 406 शेतकऱ्यांकडून 26 लक्ष 41 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 34 हजार शेतकऱ्यांना 253 कोटी 63 लक्ष रुपये अदा करण्यात आले आहे. उर्वरित चुकारे लवकरच अदा केले जातील.
जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये एकूण 171 कोटी 12 लाख निधी खर्च झालेला असून त्यामधून 38 लाख 50 हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झालेली आहे असे त्यांनी सांगितले.
गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे जिल्हा वार्षिक योजनेमधून 20 वर्ग खोल्यांचे डिजीटायजेशन करण्यात आले आहे. या अत्याधुनिकीकरणामुळे मुलांना उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण घेणे सोपे झाले आहे. गोंदिया शासकीय तंत्रनिकेतन ही संपूर्ण डिजीटायजेशन झालेली राज्यातील पहिली संस्था आहे. याबद्दल संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक व विध्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.
यासोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागामार्फत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड पोलीस, महिला होमगार्ड पोलीस, माजी सैनिक दल, फुलचूर हायस्कुल फुलचूर, मनोहर म्युन्सीपल हायस्कुल गोंदिया, बँड पथक, पोलीस श्वान पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन दल व शार्ट सर्कीट फायर पथक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी भारत सरकारच्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच ई-सिगारेट बंदीबाबतच्या 18 सप्टेंबर 2019 च्या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता आज प्रजासत्ताक दिनानिमीत्त तंबाखु मुक्तीती शपथ घेण्यात आली.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांचेसह विविध विभागातील कार्यालय प्रमुख उपस्थित होते.