जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे आठवडी बाजारात 5 ते 6 अनोळखी तृतीयपंथांनी एका तृतीय पंथाला बेदम मारहाण करून त्याचा अंगावरील साडी व ब्लाउज फाडून बाजारात नग्नधिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली. सविस्तर घटना अशी की, आश्विनी उर्फ अमोल हरिभाऊ रेवाडे, वय- 37 वर्षे, रा. सिंधी रेल्वे ता.सेलू, जिल्हा वर्धा, असे फिर्यादी तृतीयपंथाचे नाव असून तो अनेक वर्षापासून सिहोरा परिसरात आठवडी बाजारातून पैसे मागून आपला उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान 3 फेब्रुवारी रोज शनिवारला सिहोरा येथील आठवडी बाजारात अनोळखी 5 ते 6 तृतीयपंथी रा. सर्व बालाघाट म. प्र. यांनी अश्विनीला ‘तू आदमी होकर छक्का जैसा रहता है और हमारी बिरादरी को बदनाम करता है’ असे म्हणत त्याला थापड बुक्क्यांनी मारहाण केली व त्याच्या अंगावरील ब्लाउज व साडी काढून भर बाजारात नग्नधिंड काढली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालावरून अनोळखी 5 ते 6 आरोपी तृतीयपंथाविरुध्द सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस उपनिरीक्षक ऋषीदास तांडेकर करीत आहेत.