

न्यूजप्रभात वृत्तसेवा
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर जिल्हा जळगाव येथे पार पडले. यामध्ये डॉ. श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीचे प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते पार पडले.
नव्या पिढीमध्ये वर्तमान स्थितीतील समस्यांचा वेध घेणारे कादंबरीकार निर्माण होत आहेत. डॉ श्रीकांत पाटील यांनी कडेलूटच्या माध्यमातून पर्यावरणविषयक ऐरणीवरील प्रश्नाला हात घातलेला आहे. सशक्त आशय आणि एका महत्त्वाच्या प्रश्नाचा वेध कादंबरीकाराने घेतलेला आहे. आज नवीन पिढी ताकदीने लिहिते आहे. या पिढीतील प्रमुख कादंबरीकार म्हणून डॉ. श्रीकांत पाटील यांची दखल आपणास घ्यावी लागेल असे गौरवोद्गार डॉ. रवींद्र शोभणे यांनी काढले.
प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते. अलीकडे साहित्याचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भागात सरकत असून ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रश्नांच्या वर भाष्य करणारी नवी पिढी आज लिहिती झालेली आहे. डॉ. श्रीकांत पाटील यांनी नव्याने उद्भवलेल्या प्रश्नांवरती लाॅकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या कादंबऱ्या लिहून आपली कादंबरीकार म्हणून ओळख अधोरेखित केलेलीच आहे. कडेलूट ही कादंबरीसुद्धा एका महत्त्वाच्या प्रश्नाचा मागोवा घेणारी कादंबरी आहे. वास्तवाधिष्ठित प्रश्नांचा वेध घेणारा हा कादंबरीकार आहे. संस्कृती प्रकाशनच्या सौ. सुनिता राजेपवार यांनी या कादंबरीची अतिशय दर्जेदार निर्मिती केलेली असून वाचक निश्चित या कादंबरीचे स्वागत करतील असा विश्वास व्यक्त केला व लेखकाचे अभिनंदन केले.
प्रकाशन सोहळ्यास विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मा. प्रदीप दाते, उपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा व संस्कृती प्रकाशनच्या सौ. सुनिताराजे पवार, सहकार्यवाह मा. वि. दा. पिंगळे, विभागीय कार्यवाह मा. राजन मुठाणे, कादंबरीकार प्रा. दि. बा. पाटील, कथाकथनकार आप्पासाहेब खोत, मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष मा. चंद्रकांत निकाडे, कवयित्री कु. तनुश्री पाटील, कवी लक्ष्मण हेंबाडे आदी मान्यवर व साहित्य रसिक उपस्थित होते.


