आपला विदर्भगोंदिया

गोंदिया ग्रंथोत्सव ८ व ९ फेब्रुवारी रोजी

गोंदिया / धनराज भगत

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारी २०२४ रोजी शारदा वाचनालय, नगर परिषद जवळ, गोंदिया येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद, कविता वाचन यासह ग्रंथ प्रदर्शन असणार आहे. हा ग्रंथोत्सव नागरिक व साहित्यिकांना पर्वणी असेल अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी मीनाक्षी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ शिवकुमार शर्मा हे यावेळी उपस्थित होते.

        गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवास सुरुवात होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नेहरू चौक, गांधी प्रतिमा ते शारदा वाचनालय असा ग्रंथदिंडीचा मार्ग असणार आहे. सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व पटकथा लेखक श्याम पेठकर हे असतील.

        खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, अशोक नेते, सुनील मेंढे, आमदार सर्वश्री अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हाधिकारी प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, प्र. सहाय्यक ग्रंथालय संचालक रत्नाकर नलावडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व शिक्षणाधिकारी कादर शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

        सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कविसंमेलन होणार आहे. शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ‘देहदान व अवयव दान काळजी गरज’ या विषयावर परिसंवाद घेण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी १२ ते २ या वेळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळा महत्व’ या विषयावर परिसंवाद तर तृतीय सत्रात दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रंथोत्सव कार्यक्रमामागील उद्देश’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

        ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. ग्रंथोत्सवातील परिसंवादात तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. या ग्रंथोत्सवात सहभागी होऊन साहित्याचा आस्वाद घ्यावा व ग्रंथ खरेदी करून वाचन चळवळ वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रंथोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष रत्नाकर नलावडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मीनाक्षी कांबळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!