प्रतिनिधी- अमोल कोलपाकवर
आलापल्ली:- फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या प्राणहिता वन प्रकल्प विभाग, आलापल्लीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची सोय म्हणून तब्बल ३ कोटी २५ लाखांच्या निधीतून १२ निवासस्थानांची तीन मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून रविवार (४ जानेवारी) रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात शासनाची अनेक महामंडळ कार्यरत आहेत त्यापैकी आर्थिक सक्षम असलेल्या महामंडळांपैकी वन विकास महामंडळ हे एक असून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आलापल्ली येथे प्राणहिता वन प्रकल्प विभाग,मार्कंडा वन प्रकल्प विभाग तसेच या अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एकाच परिसरात निवासाची सोय आहे.अनेक वर्षांपूर्वीची इमारती असल्याने याठिकाणी वास्तव्याने राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.यातील अनेक इमारत मोडकळीस गेले आहे.एवढेच काय तर पावसाळ्यात दरवर्षी येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागत होते.त्यामुळे याठिकाणी नूतन निवासस्थानांची गरज होती.
येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन या परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी प्राणहिता वन प्रकल्प विभाग, अल्लापल्लीचे विभागीय व्यवस्थापक डी एस चांदेकर यांनी पाठपुरावा करत निधीची मागणी केली होती.अखेर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झाली असून तब्बल ३ कोटी २५ लाखांच्या निधीतून १२ निवासस्थानांची तीन मजली ईमारत उभी केली जाणार आहे.सोबतच विद्युतीकरण, वाहनतळ,कुंपण रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे.दरम्यान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आगमन होताच प्राणहिता वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक डी एस चांदेकर यांनी त्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
भूमिपूजनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,विभागीय व्यवस्थापक डी एस चांदेकर, सिरोंचाचे उपवनसंरक्षक पूनम पाटे,भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मिणा,आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, सहाय्यक व्यवस्थापक चंद्रकांत राजपूत, सहाय्यक व्यवस्थापक अमोल नागे,सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, आलापल्लीचे ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वनविकास महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.