प्रतिनिधी – अमोल कोलपाकवार
गडचिरोली :जिल्ह्यातील एसटी महामंडळात बसेसची कमतरता बघता याठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गडचिरोली जिल्ह्यासाठी नवीन ५५ बसेस मिळणार आहेत.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरिता गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून गडचिरोली जिल्ह्याकरिता ५५ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेणे अधिक सोयीस्कर होणार असल्याचा विश्वास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.
मानव विकास योजनेंतर्गत राज्यभरात निवडलेल्या २३ अतिमागास जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी ५ बसेस यानुसार राज्यातील १२५ तालुक्यांसाठी ६२५ बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील आदिवासीबहुल व विकासाच्या प्रवाहात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकरिता उपलब्ध बसेस, प्रत्यक्ष सुरू असलेल्या बसेसची संख्या, बसेसचे आयुर्मान १०वर्ष किंवा ६.५० लक्ष किमी असल्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी ५५ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन होता. या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यासाठी ५५ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रती बस अंदाजे ४० लक्ष याप्रमाणे एकूण ५५ अतिरिक्त बसेससाठी २२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य परिवहन महामंडळाने बसेसच्या खरेदीसाठी आवश्यक ती कारवाई करून खरेदीसाठी लागणाऱ्या निधीची मागणी मानव विकास आयुक्तालयाकडे करावयाची आहे. शासनाकडून मानव विकास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला बसेस मिळाव्यात, यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विशेष प्रयत्न केले होते. या बसेसमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या स्वप्नांना निश्चितच बळकटी मिळणार आहे.https://newsprabhat.in/?p=82801&preview=true