मिर्झा बेग, सुनिल पॉल, एहसान कुरेशी व मेधा गाडगे यांनी गाजवला महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस

0
50

लावण्याचा बहारदार कार्यक्रम

हास्य व विनोदात रमले प्रेक्षक

   गोंदिया / धनराज भगत

सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस वऱ्हाडी कवी मिर्झा रफी बेग, विनोदवीर सुनिल पॉल, एहसान कुरेशी व लावणी कलाकार मेधा गाडगे यांनी गाजवला. विनोदी वऱ्हाडी कविता व नर्म विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हासविले. एकंदरीत दुसरा दिवस क्षणभर का होईना ताण, तणाव व दुःख विसरायला लावणारा राहिला.
         महासंस्कृती महोत्सवात 13 फेब्रुवारीला वऱ्हाडी कवी मिर्झा बेग, हास्य कलाकार सुनिल पॉल व एहसान कुरेशी यांनी गोंदियातील रसिकांना हास्य कलेच्या माध्यमातून लोटपोट केले. तसेच लावण्यवती अभिनेत्री मेधा गाडगे यांनी लावणीच्या माध्यमातून गणराया यावे धावूनी, या रावजी तुम्ही बजा भाऊजी, सांगानं कशी दिसते मी या नववारी साडीत, थांबला कां ? या बसा राजे आदी गाण्यांच्या माध्यमातून आपले अभिनय प्रस्तुत केले. लावणीच्या माध्यमातून विजया कदम यांनी वाट पाहते मी गं येणार साजन माझा, कविता पांडे यांनी यावं यावं दिनाचा दिन बरा, अंबिका पुजारी यांनी तुम्हा बघून तोल माझा गेला, सागरी देशमुख यांनी हिऱ्याची अंगुठी रुसुन बसली लयी दिवसानी झालीया भेट, विजया कदम यांनी मला जाऊ द्यानं घरी आता वाजले की बारा. शेवटी लावण्यवती मेधा गाडगे यांच्याद्वारे प्रस्तुत पाहुणं मला घराकडे जाऊ द्या, जाऊ द्या सोडा आता सजना मला या भैरवी गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व कलाकारांना जिल्हा प्रशासनाद्वारे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील, उपविभागीय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उध्दव नाईक यांचेसह रसिक बांधव-भगिनी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे सायंकाळी 6.00 वाजता “ऐका दाजीबा” गायिका वैशाली सामंत यांचा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांसाठी प्रवेश फी नि:शुल्क आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून बहारदार गाण्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.
Previous articleपरीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – प्रजित नायर
Next articleचक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती निमित्त गोंदियात भव्य महारॅलीचे आयोजन