गोंदिया / धनराज भगत
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार जोडणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिनांक 21 फेब्रवारी 2024 पुर्वी प्राधान्याने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 3275 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 7836 शेतकऱ्यांचे आधार लिंकींग प्रलंबीत आहेत. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सीएससी केंद्रामार्फत ई-केवायसी करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडून त्या खाल्याला आधार सीडींग करण्याचे काम दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पूर्वी पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्रत्येकी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहे. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया प्रलंबीत असल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार लिंकींग करणे आवश्यक आहे. आधार लिंकींग अभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय व तालुक्यातील कृषि सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.