शहरातील मरारटोली परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलाला पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवती सम्राट राजभोज यांचे अधिकृतपणे नाव देण्यात यावे, यासाठी खा. पटेल हे कटिबद्ध आहेत.
लवकरच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही माजी आ. राजेंद्र जैन यांनी दिली. येथील जिल्हा क्रीडा संकुलाला पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देऊन फलक लावण्यात आला होता. मात्र, परिसरात झालेल्या बांधकामामुळे तो फलक काढण्यात आला. या प्रकाराची दखल घेऊन शनिवारी (दि. १७) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुन्हा फलक लावण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील पोवार समाजबांधवांनी जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल घेऊन क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या क्रीडा संकुलाला चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देऊन त्याठिकाणी फलक लावण्यात आला होता. मात्र, क्रीडा संकुलाच्या बांधकामादरम्यान हा फलक काढण्यात आला होता.
दरम्यान, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा चक्रवती सम्राट राजभोज यांच्या नावाचा फलक लावण्यात आल्याचे माजी आ. जैन यांनी सांगितले. यावेळी विनोद हरिनखेडे, अजय लांजेवार, केतन तुरकर, नानू मुदलियार, हरगोविंद चौरसिया, शर्मिला पाल, माधुरी नासरे, राजेश दवे, राज शुक्ला, संजीव राय, आरजू मेश्राम,बंटी चौबे, सरभ मिश्रा उपस्थित होते.