आदिवासी विकास मंत्री उपस्थित राहणार
विविध लाभाचे वाटप होणार
गोंदिया / धनराज भगत
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी च्या वतीने बुधवार 21 फेब्रुवारी 2024 रोजी शासकीय आश्रम शाळा जमाकुडो ता. सालेकसा येथे सकाळी 11.00 वाजता व एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल बोरगाव बाजार ता. देवरी येथे दुपारी 3.00 वाजता आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रमुख उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मेळावा तसेच विद्यार्थी पालक मेळावा याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळावा कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. आदिवासी शबरी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 मधील शबरी आदिवासी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात येईल. सन 2022-23 अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना लाभाचे अर्थसहाय्य बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. आदिवासी शबरी वित्त विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय देवरी कार्यालय अंतर्गत सन 2023 -24 योजना अंतर्गत कर्ज योजना मंजुरी आदेश लाभार्थी व एपीओ केंद्रांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे.
सदर वाटप मंत्री विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात येईल. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी केले आहे.

