निवडणुकीची कामे काळजीपूर्वक करावी – जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
89

 आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आढावा

      गोंदिया / धनराज भगत

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत. सदर निवडणुकीचे कामकाज करतांना आदर्श आचारसंहितेचे पालन करुन नोडल अधिकाऱ्यांवर सोपवलेली जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक लक्ष्य देवून पारदर्शक व निर्भयपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिले.
         जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. नायर बोलत होते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनंथम, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर यांचेसह सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
         जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले, येणारी लोकसभा निवडणूक ही आदर्श आचारसंहितेत पार पाडावी यासाठी अंमलबजावणी यंत्रणातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. निवडणुकीची कार्यपद्धती, नियमावली व इतर वेळोवेळी निर्माण होणाऱ्या विविध अडचणींचा विचार करुन निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत प्रशिक्षणही पार पाडली जात आहेत. नियमांचा काटेकोर वापर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन निवडणुकीच्या कामासाठी कटीबद्ध होण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिले.
        येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान नोडल अधिकाऱ्यांनी कामकाज करतांना स्वत:हून कोणतेही निर्णय घेवू नये. निवडणूक कामकाजात आप-आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. लोकसभा निवडणुकीत आपल्याला यावर्षी ‘स्वीप’ अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे. लोकसभा निवडणूक अनुषंगाने सर्व सभा व प्रशिक्षणामध्ये नोडल अधिकाऱ्यांनी आपला सहभाग वाढवावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
Previous articleकचारगड़ यात्रेनिमित्त वाहतूक बदल
Next articleगोंदिया ब्रेकिंग :- ‘ते’ घरुन पळून गेलेले अल्पवयीन मुले अखेर गोंदिया पोलिसांना सापडले…