आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या पथकांचे प्रशिक्षण
गोंदिया / धनराज भगत
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने प्रत्येक बाबींसाठी लिखित सूचना निर्गमीत केल्या आहेत. विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून या सूचना आपल्याला देण्यात येणार आहेत, त्या नीट समजून घेऊन काम करणे अपेक्षित आहे. निवडणूक कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची कामे सुव्यवस्थीत व जबाबदारीने पार पाडावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या पथकांच्या प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्धन खोटरे, कर व प्रशासकीय अधिकारी मोहीत राजनकर, लेखाधिकारी संदिप बोरकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील निवडणुकांशी संबंधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक विषय (Theme) नुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचे कामकाज करतांना सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती अवगत करुन त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी C-Vigil, ESMS, MCC Report व आवश्यक मुद्यांबाबत जसे- विधानसभा मतदार संघात तयार करण्यात आलेले भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, छायाचित्रीकरण पाहणी पथक व निवडणूक खर्च तपासणी पथक यांचे प्रशिक्षण जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे संबंधितांना दिले.
सदर प्रशिक्षणास लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कामकाजात नियुक्त करण्यात आलेले विविध बँकेचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.