गोंदिया / धनराज भगत
पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गोंदिया मार्फत २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजा अदासी ता. गोंदिया येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले हे अध्यक्षस्थानी असतील.
जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था पशुपालन व शेतीवर अवलंबून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन करण्याकरीता पशुपालकांचा कल पशुसंवर्धनाकडे वाढतच चाललेला किंबहुणा पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बनु पाहत आहे. अनुसूचित जाती/जमाती, महिला, सुशिक्षीत बेरोजगार व सर्वसाधारण प्रवर्ग यांचे सामाजिक आर्थिक उत्थान करण्याकरीता पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत पशुपालकांना उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध आहे.
जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीमध्ये गोंदिया जिल्हयातील पशुपालकांच्या उत्कृष्ट जनावरांचा देखावा व पुरस्कार, पशुसंवर्धन विभागामार्फत विविध तांत्रिक बाबींचे मॉडेल्सव्दारे प्रदर्शन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी पशुप्रदर्शनीचे वैशिष्ट आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत हे उपक्रम राबवित असतांना पशुपालक, शेतकरी यांनी पशुपालन व्यवसायातून अधिक समृध्द व्हावे, नवे उद्योजक तयार व्हावे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
शेतकरी व पशुपालक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, पशुसंवर्धन समिती सभापती रुपेश कुथे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले यांनी केले आहे.

