अर्ज करण्याचे आवाहन
गोंदिया / धनराज भगत
कृषी क्षेत्रामध्ये यांत्रीकीकरणाचा वापर वाढविण्याकरिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे. ड्रोन द्वारे पिकांवर किटकनाशकाची फवारणी सुलभरीत्या करता येते. मात्र योग्यरित्या ड्रोन चालवू शकणारे मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही. शेती क्षेत्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक सुरेश बगळे यांनी केले आहे.
तसेच हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य ९ प्रकारची कृषी उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणे तर शेतकरी उत्पादक कंपनीतील लक्षित गटातील सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना क्षमता बांधणी प्रशिक्षणे विविध संस्थेमार्फत सारथीच्या खर्चाने देण्यात येत आहे. या तिन्ही योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ असून सविस्तर माहिती www.sarthi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी लक्षित गटातील सर्व शेतकरी वर्गाने या तिन्ही योजनांचा अधिकाधिक फायदा घ्यावा, असे आवाहन नागपूर येथील सारथीच्या विभागीय कार्यालयातील उपव्यवस्थापकीय संचालक सुरेश बगळे यांनी केले आहे.