पोलिओ लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – एम. मुरुगानंथम

0
10
1

 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

1 लाख 548 बालकांचे होणार लसीकरण

गोंदिया / धनराज भगत

  भारत हा पोलिओमुक्त देश आहे. मात्र काही देशांमध्ये पोलिओ अजुनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जागृत राहून रविवार दि.3 मार्च रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले.
         राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च 2024 रोजी राज्यात राबविण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याबाबत जिल्ह्यात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा नुकतीच घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, डॉ. साजिद खान व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
         मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम म्हणाले, कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पल्स पोलिओ मोहिमेच्या जनजागृतीसाठी बॅनर तयार करुन दर्शनी भागात लावण्यात यावे. या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील 1 लाख 548 बालकांना रविवार 3 मार्च 2024 रोजी पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन सदर मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
        एकही बालक वंचित राहू नये यासाठी पोलिओ लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात 82 हजार 320 बालकांना व शहरी भागात 18 हजार 228 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. प्रत्येक गाव व पाड्यावर पोहचून 1443 पल्स पोलिओ बुथच्या व 84 ट्रांजिस्ट टीम तसेच 34 मोबाईल टीमच्या माध्यमातून 44 प्राथमिक आरोग्य केंद्र व 258 उपकेंद्र तसेच अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व 282 पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून नियोजन केले असल्याचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी सांगितले.
         पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस घेण्यात आलेला नसेल अशा वंचित बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागात दिनांक 5 ते 7 मार्च (3 दिवस) व शहरी भागात दिनांक 5 ते 9 मार्च (5 दिवस) पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.