आपला विदर्भताज्या घडामोडीपश्चिम-महाराष्ट्रपुणे

ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र होरपळणार

हवामान खात्याचा अंदाज; अनेक राज्यांना चटका जाणवणार

पुणे, ता. १ : यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाच्या चटक्यांनी महाराष्ट्र होरपळणार असून, राज्याच्या विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटा येतील, असा मार्च ते मे दरम्यानचा उन्हाळ्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. देशातील अनेक राज्यांना उन्हाचा चटका जाणवणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान खाते आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे २०१६ पासून प्रत्येक ऋतुच्या सुरुवातीला हवामान अंदाज वर्तविण्यात येतो. ‘मल्टी मॉडेल एन्सेम्बल’च्या (एमएमई) आधारावर हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देश आणि विदेशातील हवामान संस्था आणि संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या विविध प्रारुपांच्या आधार घेण्यात आला आहे.
त्यात ‘मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम’ (एमएमसीएफएस) याचाही समावेश आहे. या अंतर्गत मार्च ते मे या उन्हाळ्याचा आणि प्रकर्षाने मार्चमधील हवामानाच्या स्थितीचा अंदाज यात वर्तविण्यात आला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल. ओडिशा आणि त्याच्या जवळच्या भागात उष्णतेच्या लाटा येतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त असतील. त्यामुळे यंदाचा उन्हाळा देशातील नागरिकांना होरपळून काढणारा ठरेल. ईशान्य भारत, पश्चिम हिमालय क्षेत्र, दक्षिणेकडील राज्यांचा काही भाग पश्चिम किनाऱ्यावर तुलनेने उन्हाचा चटका कमी असेल.
साभार : सकाळ
error: Content is protected !!