आमगाव नगरपरिषद अंतर्गत अंगणवाड्यांचा वीज पुरवठा खंडित

0
29
1

नगरपरिषदेने वीज बिल न भरल्यामुळे एक महिन्यापासून अंगणवाड्या अंधारात…

गोंदिया / धनराज भगत

आमगाव परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांच्या वीज पुरवठा नगरपरिषदेने वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. विजेअभावी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच छोट्या बालकांवर गर्मीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती बळावली आहे.
अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन म्हणजेच प्रारंभिक बाल्यावस्था शिक्षण बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिने महत्वाचं असतं. प्रारंभिक बाल्यावस्था म्हणजे 8 वर्षांपर्यंतचा वयोगट कुपोषण हा देखील महत्वाचा प्रश्न. हेच लक्षात घेऊन सरकारने 1975 मध्ये अंगणवाड्यांची सुरुवात केली. सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवेअंतर्गत (ICDS) या अंगणवाड्यांची सुरुवात झाली.
त्याचा उद्देश होता बालकांमधल्या कुपोषणाविरोधात लढा.
अंगणवाडीचा शब्दश: अर्थ होतो अंगणामधला निवारा. अंगणवाड्या चालतात त्या याच संकल्पनेवर.
घराजवळच्या परिसरात पुर्वप्राथमिक वयोगटातल्या मुलांना एकत्र करायचं आणि त्यांना खेळता खेळता शिक्षण आणि खाणं द्यायचं असं त्याचं स्वरुप.
पण याच अंगणवाड्यांवर आज आमगाव नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या व हक्काकरिता संप पुकारला होता. 2 महिन्यांनंतर अंगणवाड्या पूर्ववत सुरू झाल्या. परंतु मागील 1 महिन्यांपासून आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांचा वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच चिमुकल्या बालकांवर उष्णतेच्या झळा सोसण्याची वेळ आली आहे. 3 ते 6 वयोगटातील चिमुकली बालके सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत अंगणवाडी मध्ये असतात परंतु पंख्याअभावी भर दुपारच्या उष्णतेमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज पुरवठा सुरू करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा नगर परिषदेला अर्ज केला आहे तसेच वारंवार तेथील कर्मचाऱ्यांना विनंतीसुद्धा केली आहे पण कर्मचाऱ्यांकडून पुरेसा मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
विजेअभावी भर उन्हाळ्यात आपल्या बालकांना अंगणवाड्यात पाठवायचे की नाही असाही प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झालेला असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.