भंडारा / सुनील तुरकर
लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. नुकतीच केंद्रातून लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अपेक्षित नावांचा समावेश असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजपला लोकसभेचे उमेदवार निवडताना कमालीची कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचा महायुती सरकार असल्याने प्रत्येक पक्षाला समाधानकारक जागा मिळणे अपेक्षित आहे. लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर सदर लोकसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपसाठी ही जागा मोकळी झाली आहे. त्यातच भाजप पक्षामधून विद्यमान खासदार सुनील मेंढे हे पुन्हा एकदा तिकीट मिळण्यासाठी आग्रही आहेत. परंतु त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल पाहिजे तितका प्रभावी नाही म्हणून की काय त्यांचे नाव स्पर्धेतून मागे होत आहे व नवीन नावाची चर्चा जोमात सुरू आहे.पर्याय म्हणून भाजपने माजी मंत्री परीनय फुके यांच्या माध्यमातून रणसिंग फुंकले आहे. परंतु भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला असता या लोकसभा क्षेत्रात बाहेरच्या उमेदवारांना कधीच यश मिळाले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा डॉक्टर श्रीकांत जिचकर असो या दिग्गजांना इथं पराभव पत्करावा लागला आहे. हे कटू सत्य आहे.महाराष्ट्रात किंवा केंद्रात कोणाची हवा असो परंतु भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील मतदारांवर मात्र त्याचा काहीच असर होत नाही. अलीकडेच या लोकसभा क्षेत्रात भाजप कडून पोवार समाजाचा उमेदवार मिळावा यासाठी पोवार समाजाने दंड थोपटले आहे. भाजपचेच स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून पोवार समाजाचाच भाजप चा उमेदवार असावा आणि बाहेर चा उमेदवार तर नकोच अशी दबक्या आवाजात चर्चा आहे . नुकतेच साकोली येथे लोकसभा निवडणुकीसाठी आढावा बैठकीसाठी आलेल्या पक्ष निरीक्षकांना सुद्धा याचा अनुभव आला.मग भाजपाकडून पोवार समाजाचा नेता कोण? जो सर्वाना चालेल. पोवार समाजाकडून दोन नाव चर्चेत आहेत एक म्हणजे डॉक्टर प्रशांत कटरे व राजेंद्र पटले. डॉक्टर प्रशांत कटरे यांचा नावाला गोंदिया जिल्ह्यात किंवा भाजप कार्यकारणीत ओळख असली तरी मात्र भंडारा जिल्ह्यात हे नाव फारसे परिचित नाहीत. परंतु सर्वांना ओळखीचा असलेला नाव म्हणजे भाजपचे किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांचे नाव चर्चेत आहे. राजेंद्र पटले यांनी शासकीय नोकरी चा त्याग करून त्यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले आहे. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी सामान्य गोरगरीब युवक शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने अनेक मोर्चे केले आहेत. मुळात भाजपाचे संस्कार असलेले राजेंद्र पटले यांनी एकदा अपक्ष लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे. बेरोजगार गरीब शेतकरी वर्गात किसान गर्जना संघटनेच्या च्या माध्यमातून भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्ह्यात त्यांची मजबूत पकड आहे. दोन्ही जिल्ह्यात त्यांची स्वतःची वोट बँक आहे. सोशल मीडिया आणि युवकांमध्ये त्यांची उत्तम पकड आहे. परंतु त्यांचा एक वीक पॉईंट म्हणजे त्यांनी एकदा शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु भाजप पक्ष अनेक आयारामांना जर मंत्रीपदापर्यंत आणि राज्यसभेपर्यंत संधी देऊ शकते. तर राजेंद्र पटले सारख्या प्रामाणिक आणि भाजप साठी झटणाऱ्या संघर्ष योद्धाला तिकीट का बर देऊ शकत नाही? अशी छुपी चर्चा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सुरू आहे. काँग्रेस पक्षाकडून या लोकसभा क्षेत्रासाठी नाना पटोले कंबर कसून आहेत. कितीही झाले तरी ‘नाना अभी जिंदा है’अशी ताकद त्यांची लोकसभा क्षेत्रात आहे. काँग्रेस पक्ष जरी कमकुवत वाटला तरी काँग्रेस पक्षामध्ये एकमत आहे . शिवाय थोड्याफार प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मदत मिळणारच आहे. परंतु भाजप पक्षात मात्र अशी स्थिती नाही. जर का विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना तिकीट मिळाली नाही. तर निश्चितच त्यांचा गट नाराज होईल. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वरून “हम साथ साथ है” असे जरी दिसत असले तरी “अंदर की बात” वेगळी आहे. कारण आज पर्यंत भंडारा गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांचीच राजकीय लढाई राहिली आहे. स्थानिक पातळीवर इतक्या लवकर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची दिल जमाई होईल हे इतके सोपे नाही. त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभेचा निकाल हा योग्य उमेदवारच अवलंबून असेल.भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात कोणत्याही पक्षाला सहज निवडणूक जिंकता येणार नाही. योग्य उमेदवार ज्यांचा असेल त्यालाच विजयाचा कौल मिळणार आहे. जर भाजप पक्षाला सर्वांची नाराजी थोपवून विजयी उमेदवार पुढे करायचा असेल तर तो नाव म्हणजे फक्त राजेंद्र पटलेच आहे. परंतु अतिशय सामान्य परिस्थिती असल्यामुळे त्यांचा टिकाव पक्ष श्रेष्ठींपुढे लागणार की नाही यासाठी मात्र अनेकांना शंका आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात राजेंद्र पटले यांची “बिचारा राजेंद्र भाऊ ” ही प्रतिमा आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात राजेंद्र पटले यांचे नाव सामान्य बेरोजगार व शेतकऱ्यांच्या मुखावर आहे यांना जर भाजप ची टिकीट मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाचे ही मते छुप्या पद्धतीने राजेंद्र पटले यांनाच मिळतील अशी सध्याची राजकीय परिस्थिती भंडारा गोंदिया जिल्ह्यात आहे.