सुवर्णकार समाज सांस्कृतिक भवन, रिंग रोड गोंदिया येथे रविवारी (ता ३ ) संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात सुवर्णकार समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ प्रदिप रोकडे यांची पुन्हा एकमताने निवड करण्यात आली. सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी व गजानन महाराज प्रकट दिन समाजाच्या सांस्कृतिक भवनात माजी प्राचार्य सुनिल भजे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव भरणे यांनी केले. विशेष अतिथी म्हणून अमृतराव यावर, अनुराधा रेभे , सेवानिवृत्त विक्रीकर निरिक्षक मधुकर कावळे, गोंदिया जिल्हा परिषद गटनेते सुरेश हर्षे, रमेश उदापुरे, नाना भाऊ पोकळे, धनराज येरपुडे, होते. रविवारी सकाळी ११ वाजता संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पुजन, दहीकाला व महाआरती करण्यात आले. या प्रसंगी धापेवाडा येथील गुरुदेव सेवा मंडळाचे ह. भ. प. विक्की चन्ने महाराज यांनी नरहरी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या वेळी जिल्हा परिषद गोंदिया चे गटनेते व आमगाव तालुका राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेश हर्षे यांनी मार्गदर्शन केले. दुपारी २.३० वाजता जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा घेण्यात आली. यामध्ये सचिवांचे स्वागत भाषण व अहवाल वाचन, २०२२-२३ पर्यंतच्या जमाखर्चास मंजुरी देऊन अंकेकक्षकाची नियुक्ती करण्यात आली.तसेच नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली व सुवर्णकार समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ प्रदिप रोकडे यांची पुन्हा एकमताने निवड करण्यात आली.