महागावसह जिल्ह्यातील तीन उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मंत्री,धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती.

0
2
1

न्यूज प्रभात.-प्रतिनिधी अमोल कोलपाकवार

 

गडचिरोली:-मागील बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहेरी तालुक्यातील देवलमरी आणि महागाव-गेर्रा त्यासोबतच गडचिरोली तालुक्यातील पोर्ला उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

 

अहेरी उपविभागात बारमाही वाहणारे नद्या आहेत.मात्र, येथील शेतकऱ्यांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. परिसरातील नागरिकांना या बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करून शेती करता यावं या उदात्त हेतूने मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे गेल्या अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजना आणण्यासाठी प्रयत्नात होते.शिवाय सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी देखील होती.

 

राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यावर धर्मराव बाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागली.मागील बरेच वर्षांपासून रखडलेल्या जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला.अखेर मागील महिन्यात सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर नुकतेच झालेल्या बैठकीत महागाव/गेर्रा,देवलमरी आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला या तीन उपसा सिंचन योजनेला मंत्रालय स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे.

 

विशेष म्हणजे देवलमरी आणि महागाव/गेर्रा ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर असून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहेत.या दोन्ही ठिकाणी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्याने या परिसरातील अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. परिसरातील विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होऊन परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

 

बॉक्स–

आपल्या जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांवर उपसा सिंचन योजना आणल्यास त्या पाण्याचा उपयोग येथील शेतीसाठी होईल त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात होतो. जिल्ह्यातील रखडलेल्या उपसा सिंचन योजनेचा वारंवार पाठपुरावा केल्याने यश मिळालं आहे.सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका,रेगुंठा, अहेरी तालुक्यातील देवलमरी,महागाव/गेर्रा आणि गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरातील शेकडो गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. विशेष म्हणजे रोजगार,शिक्षण आणि सिंचन यावर आपला भर असून जिल्ह्यातील रखडलेले पूर्ण काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

-धर्मराव बाबा आत्राम

मंत्री अन्न व औषध प्रशासन म.रा.