भजेपार ग्राम पंचायतीला वर्षभरात 53 लाख 60 हजार रुपयांची बक्षीसे…

0
45

स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

सालेकसा / बाजीराव तरोने

तालुक्यातील भजेपार ग्राम पंचायतीला मागील वर्षभरात तब्बल 53 लाख 60 हजार रुपयांची बक्षिसे घोषीत झाली असून या ग्राम पंचायतीला जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने नुकतेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विविध प्रकारचे सेवाभावी उपक्रम, नवोपक्रम, क्रीडा व शैक्षणिक कार्य, श्रमदानातून ग्राम स्वच्छता, आरोग्य विषयक कार्य, पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियान असे एक नव्हे, अनेक उपक्रम या गावात वर्षभर राबविण्यात येत असल्याने या गावाला जिल्ह्यात नवी ओळख मिळाली आहे. याचेच फलित म्हणजे मागील वर्षभरात तब्बल 53 लाख 60 हजार रुपयांची बक्षिसे या गावाने पटकावली असून या कामगिरी बद्दल ग्राम पंचायत व ग्राम वासियांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्व. आर. आर. (आबा)पाटील सुंदर गाव स्पर्धा अर्थात “स्मार्ट व्हीलेज” स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम 40 लाख रूपये तथा तालुका स्तर 10 लाख रूपये, आणि संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय तिसरे 3 लाख रूपये आणि तालुकास्तरीय 60 हजार रुपये असे एकंदरीत 53 लाख 60 हजार रुपयांची बक्षीसे प्राप्त झाली आहेत. त्यानुषंगाने गोंदिया येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय सरपंच मेळाव्यात सदर ग्राम पंचायतीचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, सभापती संजय टेंभरे, सविता पुराम, पुजा शेठ, जिप सदस्य वंदना काळे, सुरेश हर्षे, उषा शहारे, पंस सभापती मुनेश रहांगडाले सहित ईतर जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार स्विकारताना सरपंच चंद्रकुमार बहेकार, सचिव रितेश शहारे, उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, ग्राम पंचायत सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा शेंडे, आत्माराम मेंढे, ममता शिवणकर. मुख्याध्यापिका सौ. देवरे मॅडम, डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेविका विद्या बहेकार, रोजगार सेवक गोपाल मेंढे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जागेश्वर तरोणे, माजी तमुस अध्यक्ष मनिराम ब्राह्मणकर, ज्येष्ठ नागरिक प्रेमलाल बहेकार, संगणक परिचालक अखिलेश बहेकार, कर्मचारी अमित ब्राह्मणकर, दागो फुन्ने, सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धे दरम्यान पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी तथा ईतर अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्या बद्दल ग्राम पंचायत कार्यालय तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असून यासाठी स्थानिक महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सूर्योदय क्रीडा मंडळ, सर्व महिला पुरुष बचत गट यांसह गावातील तरुणाईचे विशेष योगदान असून हा पुरस्कार गावकऱ्यांच्या परिश्रमाला समर्पित असल्याचे मत सरपंच चंद्रकुमार बहेकार यांनी व्यक्त केले आहे.

 

 

ग्रामवासियांच्या परिश्रम व एकतेचे फळ

भजेपार येथील ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, बाल गोपाल, अधिकारी कर्मचारी अशा प्रत्येकच घटकाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यांच्या परिश्रमाचे आणि एकतेचेच हे फळ आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे कोटी कोटी आभार, धन्यवाद! पुरस्कारात मिळालेल्या निधीचे योग्य रित्या नियोजन करून ग्राम विकास साध्य केला जाईल.
– चंद्रकुमार बहेकार सरपंच भजेपार