मुंबई : राज्यातील वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय काल दि.11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
वनहक्क धारकांमध्ये ते ज्या शासकीय योजनांच्या लाभास पात्र आहेत त्याबाबत जनजागृती करण्यात येईल.
ज्या योजनांचे लाभ वनहक्कधारकांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक रित्या देणे शक्य आहे,अशा योजनांचा लाभ विनाविलंब वनहक्क धारकांना देण्यात येईल. सामुहिकरित्या शासकीय योजनांचे लाभ वनहक्क धारकांना मिळण्याच्या दृष्टीने वनपट्टे दिलेल्या वनहक्क धारकांचे क्षेत्रनिहाय समूह (Cluster) तयार करण्यात येईल. क्षेत्रनिहाय समूह तयार केल्यावर वनहक्क धारकांच्या मागणीनुसार ज्या योजनांचा लाभ एकत्रितरित्या वनहक्क धारकांना देणे शक्य आहे, त्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करून विविध शासकीय योजनांचे लाभ अभिसरणाच्या माध्यमातून वनहक्क धारकांना देण्यात येईल.
सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तालुका स्तरीय कन्व्हर्जन्स समितीने कालबद्ध आराखडा तयार करण्याची जबाबदारी घ्यावयाची आहे. जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीने आराखड्यास मान्यता द्यावयाची आहे.
वनहक्क धारकांना ज्या शासकीय योजनांचे लाभ देण्यास काही अडचणी उद्भवत असतील,अशा प्रकरणी अडचणींचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीने त्वरीत करुन अशा योजनांचे लाभ वनहक्क धारकांना मिळतील याची खातरजमा करावयाची आहे.

