गोंदिया / धनराज भगत
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार उद्या दिनांक 20 मार्चपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षामध्ये नामनिर्देशन पत्र प्रक्रिया होईल.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काढलेले आदेशानुसार नामनिर्देशन प्रक्रियेच्या प्रमुख अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आशा पठाण यांच्या नेतृत्वात अधिनस्त अधिकारी, कर्मचारी नामनिर्देशन पत्राची स्वीकृती, छाननी प्रक्रिया करणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार 20 मार्च ते 27 मार्च 2024 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3.00 या दरम्यान नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येतील. या दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. तसेच नामनिर्देशनासाठी येताना उमेदवार सह जास्तीत जास्त चार व्यक्तींना अशा एकूण पाच जणांना नामनिर्देशन कक्षात प्रवेश करता येईल. नामनिर्देशन पत्र प्रक्रियेसाठी येताना 100 मीटरच्या परिसरात तीन वाहनांसह प्रवेश राहील. आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार 28 तारखेला छाननी प्रक्रिया राहील. त्यानंतर 30 तारखेला अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात येईल.

