1
गोंदिया / धनराज भगत
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना २० मार्च २०२४ रोजी जारी होणार असून अधिसूचना जारी झाल्याच्या दिवसापासून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भंडारा यांचे कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारास दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून टेलिकास्ट ब्रॉडकास्ट करण्यापूर्वी, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, सार्वजनिक तसेच खाजगी एफएम चॅनेल्स, रेडिओ, सोशल मिडिया व इंटरनेट संकेतस्थळे, बल्क एसएमएस व रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस द्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.
याबाबत भारत निवडणूक आयोगाने “हँडबुक ऑन मिडिया मॅटर्स फॉर सीईओ ॲन्ड डिईओ” या मार्गदर्शिकेत सविस्तर निर्देश दिले आहेत. ही मार्गदर्शिका आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समितीमार्फत जाहिरातीचे प्रमाणीकरण करून देण्यात येईल. प्रमाणीकरण प्रमाणपत्र नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना आहेत.
जाहिरात प्रमाणिकरणाबाबत राजकीय पक्ष व त्यांच्या प्रतिनिधींनी माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीला लेखी स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. अर्जाचा नमूना समितीकडे उपलब्ध आहे. विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा. पूर्व प्रमाणिकरण नसल्यास आयोगाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी खबरदारी घ्यावी.
– प्रजित नायर, जिल्हाधिकारी गोंदिया