चारही विधानसभा मतदार संघाला मतदान यंत्र सुपूर्द

0
2
1

जिल्हाधिकारी यांची उपस्थिती

राजकीय पक्ष ही उपस्थित

         गोंदिया / धनराज भगत

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया येथील नविन प्रशासकीय इमारतीच्या गोदामात सिलबंद असलेल्या ईव्हीएम मशीन विधानसभा मतदार संघनिहाय आज वाटप करण्यात आल्या. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट वाटप करण्याकरीता आज सकाळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकीय पक्षांच्या समक्ष जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांना मतदान यंत्र वाटप करण्यात आले असून या मशीन पोलीस बंदोबस्तात चारही विधानसभा मतदारसंघात पोहचविण्यात येणार आहेत.
         यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, तहसिलदार सडक अर्जुनी अक्षय पोयाम, तहसिलदार आमगाव रविंद्र होळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोरे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रहास गोळघाटे, राजकीय पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नानू मुदलीयार, भाजपचे तिजेश गौतम, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रतिक लांजेवार व राघवेंद्रसिंह बैस, काँग्रेसचे राजकुमार पटले उपस्थित होते.
         63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात 319 मतदान केंद्र असून कंट्रोल युनिट- 414, बॅलेट युनिट- 414 व व्हीव्हीपॅट 446 आहेत. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघात 296 मतदान केंद्र असून कंट्रोल युनिट- 384, बॅलेट युनिट- 384 व व्हीव्हीपॅट 414 आहेत. 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात 362 मतदान केंद्र असून कंट्रोल युनिट- 470, बॅलेट युनिट- 470 व व्हीव्हीपॅट 506 आहेत. 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात 311 मतदान केंद्र असून कंट्रोल युनिट- 404, बॅलेट युनिट- 404 व व्हीव्हीपॅट 435 आहेत. जिल्ह्यात एकूण 1288 मतदान केंद्र असून कंट्रोल युनिट- 1672, बॅलेट युनिट- 1672 व व्हीव्हीपॅट- 1801 आहेत.