मा. ए एम खान, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया यांचे निर्णय
गोंदिया / धनराज भगत
आज दिनांक २१/०३/२०२४ रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय, गोंदिया यांनी हत्येच्या प्रकरणातील आरोपी नामे यशवंत भाऊलाल लिल्हारे, वय २२ वर्षे, रा. पिपरिया, ता. तिरोडा, जि. गोंदिया यांस भारतिय दंड विधानाचे कलम ३०२, ३९७ अंतर्गत आजन्म सश्रम कारावास व २०,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरण असे की, दिनांक ११/०४/२०१९ रोजी फिर्यादी तेजराम तुलाराम सेलोकर वय-५० वर्षे, रा. खैरलांजी, पी परसवाडा, ता. तिरोडा, जि. गोंदिया यांची पत्नी सौ अंतकला तेजराम सेलोकर, वय ४३ वर्षे ही गुरे-ढोरे चारण्यासाठी तिच्या शेतावर सकाळी ८.०० वाजता गेली असता तिला शेतावर एकटी पाहून आरोपीने तिच्या डोक्यावर, गळ्यावर व चेह-यावर काठीने व धारदार वस्तूने मारहान करून तिच्या गळयातील ५ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व २० सोन्याचे मणी असा एकुण २१०००/- रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे बळजबरीने तिच्या अंगातून काढून व तिला जखमी करून दागिणे घेवून पळून गेला होता. तेव्हा गावातील अरविंद भगत यास जखमी अंतकलाबाई ही रोडवर पडलेली दिसली असल्याने त्याने याबाबत फिर्यादीच्या मुलाला व फियाँदीला सदर घटनेची माहिती दिली. यावरून फिर्यादी शेतावर गेला असता अंतकलाबाई ही त्याला रोडच्या किना-यावर जखमी अवस्थेत पडून आढळली व तिने फिर्यादीला घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावरून फिर्यादीने तिला उपचारासाठी बजाज सेंट्रल हॉस्पीटल गोंदिया येथे दुपारी २.५० वाजता औषधोपचारासाठी भरती केले. परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराकरिता शासकीय महाविद्यालय, नागपूर येथे भरती करण्यात आले होते. त्यादरम्यान दिनांक २१/०५/२०१९ रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत सविस्तर तकार मृतक अंतकलाबाई सेलोकर हिचे पती (फिर्यादी) तेजराम सेलोकर यांनी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन दवणीवाडा येथे दिली होती. त्या आधारावर आरोपीविरूध्द कलम ३०२,३९७ भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंदवून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक श्री. जयदिप विष्णू दळवी, पो.स्टे. दवणीवाडा यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता महेश एस. चंदवानी व अति. सरकारी अभियोक्ता कृष्णा डी. पारधी यांनी एकुण १८ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली.
एकंदरित आरोपीचे वकील व फिर्यादीतर्फे जिल्हा सरकारी वकील महेश एस. चंदवानी
यांचे सविस्तर युक्तीवादानंतर तसेच कागदोपत्री पुरावा व वैद्यकीय अहवाल या आधारावर मा. ए. एम. खान, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया जि. गोंदिया यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून
१.आरोपीला कलम ३०२ भारतीय दंड विधान प्रमाणे सश्रम आजन्म कारावास व रूपये १०,०००/- दंड व व दंड न भरल्यास ६ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
२.आरोपीला कलम ३९७ भारतीय दंड विधान प्रमाणे १० वर्षाचा सश्रम कारावास व रूपये १०,०००/- दंड व व दंड न भरल्यास ६ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.