राजकीय पक्ष व उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारिक लक्ष ठेवा – निवडणूक खर्च निरिक्षक श्री हर्षवर्धन

0
3
1

नोडल अधिकारी आढावा बैठक

 गोंदिया / धनराज भगत

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष करीत असलेल्या विविध खर्चावर तसेच सभा, रॅली व कार्यक्रमात होणाऱ्या खर्चावर सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नजर ठेवावी व कुठलाही खर्च दुर्लक्षित राहता कामा नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना निवडणूक खर्च निरिक्षक श्री. हर्षवर्धन यांनी नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.

         जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर व निवडणूक खर्च नोडल अधिकारी जनार्धन खोटरे यावेळी उपस्थित होते.

        या बैठकीत विषयनिहाय आढावा घेण्यात आला. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज असून अनेक वेळा राजकीय पक्ष व उमेदवार खर्चाचा तपशील योग्य प्रकारे सादर करीत नाहीत. अशावेळी आपल्या विविध भरारी पथकाने काटेकोरपणे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे श्री. हर्षवर्धन म्हणाले.

       प्रचार जाहीर सभा, कॉर्नर सभा, प्रचार वाहन, सभेच्या अनुषंगाने होणारा इतर खर्च, बॅनर, पोस्टर, जाहिराती आदींचा खर्च नोंदविण्यात आला किंवा नाही याबाबतीत लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या निवडणूक खर्च कक्षाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली व खर्च नोंदविण्याबाबत सूचना केल्या.

       लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशिक्षण व व्यवस्थापन, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था निवडणूक, माहिती व व्यवस्थापन कक्ष, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, ईव्हीएम, निवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण, सी-व्हीजील, पब्लिक हेल्पलाइन, उमेदवार राजकीय पक्ष निवडणूक खर्च विभाग, मिडिया कक्ष (माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती) निवडणूक निरीक्षक कक्ष, मतदार जनजागृती अभियान, निवडणूक कायदेविषयक बाबी, मतदार केंद्रावरील सुरक्षा व सुविधा कक्ष, अशा विविध समित्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली.