सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे आवाहन…
गोंदिया / धनराज भगत
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपुर्ण जगभर साजरी केली जात असते…या वर्षी भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सवी वर्ष संपुर्ण देशात साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने या भारतीय प्रजासत्ताकाचे निर्माते , ज्यांनी संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरेल असे संविधान भारताला दिले आहे.त्या महापुरूषांचा जयंती महोत्सव प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायांनी व प्रत्येक भारतीयाने आपापल्या घरावर निळे झेंडे व पंचशील झेंडे लावून तसेच रोषणाई करून साजरा करावा प्रत्येक वार्डात व मोहल्ल्यात त्या त्या परिसरातील समाजबांधवानी बाबासाहेबांचे व तथागत गौतमबुध्दाचे कटआउट्स व बॅनर्स, पोस्टर्स लावून ही जयंती साजरी करावी असे आवाहन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती , आमगाव यांनी केले आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व भारतीयांनी एक उत्सव म्हणून साजरी केली पाहिजे. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव पुन्हा होणे नाही .ज्याने स्वतंत्र भारताला एकासुत्रात बांधून राष्ट्रीय एकात्मतेला प्रथम प्राधान्य दिले व त्याबरोबरच प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य , समता , न्याय , बंधुता या मुल्यांवर आधारित जगातील सर्वात मोठी लोकशाही निर्माण करणारे संविधान दिले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून देणारे महामानव आहेत. असा युगंधर पुन्हा जन्मास येणार नाही. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा 133 वा जयंती महोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करावा. प्रत्येकाच्या घरावर रोषणाई करावी, तोरणे , पताके, मेणबत्त्या लावून व रांगोळी काढून आनंदाने हा उत्सव साजरा करावा व बाबासाहेबांना अभिवादन करावे. असे आवाहन जयंती उत्सव समितीने केले आहे.

