गडचिरोली ब्युरो.
वनविभागांतर्गत वृक्षारोपण व खड्डे खोदकामाकरिता काम करणा-या मजूरांना एक वर्षाचा कालावधी लोटूनही सदर कामाची मजूरी मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाअंतर्गत सुरु असलेला हा वेळकाढूपणा गोरगरीब मजूरांच्या पथ्यावर पडला असल्याने वनविभागाच्या कामकाजाप्रती तीव्र रोष व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रात 2023 या आर्थिक वर्षात जुलै व ऑगस्ट महिन्यात मजूरांमार्फत वृक्षारोपण व खड्डे खोदकाम करण्यात आले. याकरिता 20 ते 25 मजूरांनी रोजंदारीवर कामे केली. या कामावर कमलापूरसह रेपनपल्ली, ताटीगुड्डम, कोडसेगुड्डम येथील मजूरांचा समावेश आहे. मात्र सदर काम होऊन एक वर्षाचा कालावधी लोटूनही या रोजंदारी मजूरांना मजूरीची रक्कम मिळालेली नाही. थकित मजूरीसाठी संबंधित मजूरांनी वारंवार संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना विचारणा केल्यास कागदपत्रांच्या अटी, शर्ती लावण्यात आल्या. याअंतर्गत पासबूक, झेरॉक्स प्रत, आधार कार्ड आदी सोपविण्यात आले. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही मजूरांना रक्कमेची प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सदर गोरगरीब मजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. थकित मजूरीबाबत अन्यायग्रस्त मजूरांनी सामाजिक कार्यकर्ते तथा जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समस्या मांडित थकित मजूरी मिळवून देण्यासंदर्भात निवेदन सादर केले. ताटीकोंडावार यांनी मजूरांची अडचण लक्षात घेत वरिष्ठ स्तरावर यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी करण घोडाम, राकेश, तलांडी, सुनील कोडापे, अजय तलांडी, अखिल पेंदाम, नितेश पेंदाम, नागेश करपेत, जितेंद्र पेंदाम आदी अन्यायग्रस्त मजूर उपस्थित होते.
बॉक्ससाठी…
मागील एक वर्षापासून रोजदांरी मजूर मजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. मजूरांबकडून काम करवून घेणा-या कर्मचा-यांना एक दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यास त्यांच्या परिवाराची बिकट अवस्था होऊन बसते. अशात गोरगरीब मजूर मागील एक वर्षापासून थकित वेतनामुळे कसे जीवन जगत असतील, याचा विचार करण गरजेचे आहे. संबंधित मजूरांची मजूरी तत्काळ अदा न केल्यास अन्यायग्रस्त मजूरांना घेऊन वरिष्ठ कार्यालयावर धडक देणार आहे.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

