# नवनियुक्त शिक्षण सेवकांची उद्बोधन कार्यशाळा उत्साहात संपन्न…
गोंदिया / धनराज भगत
शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्ती मिळालेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण सेवकांची एक दिवसीय उद्बोधन कार्यशाळा दि.28 मार्च 2024 रोजी स्थानिय पी पी अध्यापक विद्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली. त्या कार्यशाळेत नियुक्ती मिळालेल्या तीनशे शिक्षकांना मार्गदर्शन करतेवेळी एम. मुरुगानंथम यांनी सदर उद्गार काढले व शिक्षकांनी नेहमी नवनवीन ज्ञान, तंत्र व कौशल्य आत्मसात करून नवीन पिढी घडवावी असे आवाहन केले.
सदर उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रस्ताविकासह निपूण भारत या विषयावर डायटच्या अधिव्याख्याता पूनम घुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020, ASER, PGI, NAS, SLAS, अध्ययन स्तर निश्चिती इत्यादी विषयावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. अधिव्याख्याता डॉ. भाऊराव राठोड यांनी ICT, DIKSHA अँप, SWAYAM पोर्टल, इत्यादी तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी बाबीवर सविस्तर प्रकाश पाडला. अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत भाषा विषयाचे मार्गदर्शन साधनव्यक्ती उर्मिला वैद्य यांनी तर गणित विषयाचे मार्गदर्शन माध्यमिक शिक्षक सुभाष मारवाडे यांनी केले.
दुपारच्या सत्रात समग्र शिक्षा चे सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE) 2009 व समग्र शिक्षा च्या विविध योजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य दिलीप पडोळे यांनी 21व्या शतकातील कौशल्ये, मिनाक्षी कटरे यांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
सेल्फीसाठी उमडली झुम्मड :
गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एम. मुरुगानंथम यांचीही पहिली पोस्टिंग असून पहिल्याच महिन्यात या नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली व प्रत्येक शिक्षकाला दुर्गम भागातील शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली, व प्रत्येकाशी अत्यंत आपुलकीने व प्रेमाने वागणूक दिल्याने सर्व शिक्षक भारावून गेले असल्याचे दिसून आले. ‘अधिकारी असावा तर असा’ असे प्रत्येक शिक्षक म्हणत होता व आपल्या या प्रेमळ अधिकारी सोबत एक फोटो (सेल्फी) काढण्यासाठी सर्वांनी एकच झुम्मड (गर्दी) करून सेल्फी काढून घेतली. शिक्षकांच्या या उत्साहाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही छान प्रतिसाद दिला.