जागतिक आरोग्य दिनानिमीत्त ‘माझे आरोग्य-माझा हक्क’ घोषणेने दुमदुमले शहर

0
12
1

गोंदिया / धनराज भगत

जागतिक आरोग्य हा दिवस सर्व आरोग्य संस्थेत 7 एप्रिलला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली, त्यामुळे हा दिवस जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी  जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळावे यासाठी ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ ही थीम दिली असून त्यानुसार हा दिवस विविध उपक्रमांनी जिल्हाभर साजरा करण्यात आला.

         शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभाग जि.प. गोंदिया यांच्या संयुक्त सहकार्याने दि.7 एप्रिल रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीची सुरुवात केली.

         जागतिक आरोग्य दिनाचे महत्व लक्षात घेता यावर्षीची थीम ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ असून याबद्दल अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे म्हणाले, सर्व लोकांनी आपल्या आरोग्याबाबत गंभीर राहून काळजी घेणे आवश्यक आहे. आपले मुलभूत कर्तव्य व हक्क समजून आपल्या आरोग्यावर गंभीरतेने दक्ष राहिले पाहिजे. या बदलत्या युगात माणसाने खुप प्रगती केली त्यासोबतच आपली जीवनशैली बदलवून आपले शरीर हे नवनविन आजाराचे माहेरघर केले आहे असे त्यांनी सांगितले.

        सदर प्रभातफेरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून निघून सिव्हील लाईन-इंगळे चौक-काका चौक-जयस्तंभ चौक या मार्गाने मार्गक्रमण करुन विविध आरोग्य विषयक संदेशाने शहर दुमदुमले. या रॅली दरम्यान बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील  नर्सिंग कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी, तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत बागडे, डॉ. अमित जोगदंड, डॉ. अभय अंबिलकर, डॉ. राजेश कटरे, डॉ. अश्विनी डोंगरे, डॉ. अमृथा, डॉ. बिपलोब, सचिन ढाले, लक्ष्मण वडजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जयस्वाल, अर्चना वानखेडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यक विभागाचे सर्व निवासी डॉक्टर्स व स्टॉफ नर्स प्रामुख्याने उपस्थित होते.

         स्वस्थ रहेगा तन तो मस्त रहेगा मन, सेहत को दो पहला स्थान-तभी होगा बिमारिओंका निदान, स्वच्छ सुंदर परिसर-आरोग्य नांदेल निरंतर, विचार निरोगी ठेवा-आनंदी जीवन जगा, माझे आरोग्य-माझा हक्क, Health is Wealth अशा विविध प्रकारच्या आरोग्य संदेशाने दुमदुमले शहर.