जागतिक होमिओपॅथी दिन

0
47

होमियोपैथी चे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन

(१० एप्रिल १७५५ – २ जुलै १८८३)

होमिओपथी चे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्मदिन (१० एप्रिल १७५५) ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
जे पदार्थ त्यांच्या अतिप्रमाणात सेवनामुळे शरीरात विकार उत्पन्न करतात त्याप्रमाणेच त्यांचे लघुप्रमाणातील सेवन हे तत्सम विकार नष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात हे डॉ. हॅनेमन यांनी दाखवून दिले. म्हणूनच १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून पाळला जातो.

‘जे औषध निरोगी माणसाने घेतले असता जी लक्षणे निर्माण होतात तीच लक्षणे असलेल्या रोग्याला दिल्यास तो सुधारू शकतो, रोगमुक्त होऊ शकतो.’ हे त्यांच्या ध्यानात आले. हाच होता होमिओपॅथीचा जन्म. सर्वप्रथम आपला हा सिद्धांत त्यांनी १७९६ साली हुकलँडच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध केला तसेच रिचर्ड हेहेल यांनी नमूद केले आहे की, १७९६ हेच होमिओपॅथीचे जन्मवर्ष आहे.

डॉ. हॅनेमन यांच्या सिद्धांतानुसार सर्व होमिओपॅथिक औषधे ही वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुषांना, वेगवेगळ्या प्रमाणात (मात्रा) देऊन त्यांनी लक्षणे एकत्रित करून त्यांच्या गुणवत्तेनुसार क्रमाने मांडली. त्या प्रक्रियेस ‘मटेरिया मेडिका’ असे म्हणतात. होमिओपॅथी उपचार पद्धती फक्त जुन्या व दीर्घकालीन आजारांसाठीच असून, त्याचा गुण हळूहळू येतो, हे सर्वथा चुकीचे आहे. याउलट किरकोळ, छोट्या आणि अल्पकालीन आजारातही होमिओपॅथी औषध अचूक आणि योग्य मात्रेत दिल्यास तत्काळ फरक पडतो.

दमा, संधिवात, त्वचेचे आजार, सर्दी, खोकला, मूतखडे होण्याची प्रवृत्ती, पित्ताशयातील खडे, मणक्यांचे आजार, वारंवार तोंड येणे, केसांच्या समस्या, केस गळणे, कोंडा होणे, मानसिक दुर्बलता यांसारखे आजार होमिओपॅथीने समूळ नष्ट होऊ शकतात. आज होमिओपॅथीला जगमान्यता प्राप्त झाली असून, दुर्धर रोगांवरही यामध्ये कायम स्वरूपी इलाज आहे, असा विश्‍वास समाजात निर्माण झाला आहे. याचे सारे श्रेय त्या होमिओपॅथीच्या महान जनकास म्हणजेच डॉ. हॅनेमन यांना दिले जाते.

डॉ राजेश हत्तीमारे
हत्तीमारे होमिओपॅथिक चिकित्सालय,एंड चाईल्ड डेवलपमेंट इंस्टिट्यूट,सिव्हिल लाईन गोंदिया.