जिल्हास्तरीय शाळापूर्व तयारी कार्यशाळा उत्साहात संपन्न ; मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांची उपस्थिती

0
16
1

गोंदिया / धनराज भगत

सत्र 2024-25 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागत बालकांची शाळापूर्व तयारी होण्याच्या दृष्टीने मागील राज्यात शाळास्तरावर मेळावे आयोजित केले जातात. या मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन होन्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व केंद्रस्तर प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे मार्फत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात येतात. त्याच अनुषंगाने आज(10) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न झाले.
प्रशिक्षणाला जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, यापुढे डायट व जिल्हा परिषद एकत्र येऊन जिल्ह्यातील गुणवत्तेसाठी काम करणार आहे, त्यामुळे हे शाळापूर्व तयारी अभियान 2024-25 हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात यावे जेणेकरून इयत्ता पहिलीत दाखल होणारा विद्यार्थी हा शाळेसाठी व शिकण्यासाठी योग्यरीत्या तयार होईल. सोबतच इयत्ता दुसरी ते अठवी पर्यंतच्याही विद्यार्थ्यांसाठी असा अभियान राबवून त्यांचीही वरच्या वर्गाची तयारी करून घ्यावी अशी सूचना केली. तसेच इतर प्रशासकिय बाबींवर मार्गदर्शन केले. शिक्षकांनी वर्गात अध्यापन करतेवेळी संपुर्ण तयारीनिशी जावे, प्रत्येक शिक्षकांनी उद्या काय शिकविणार याबाबत नोट्स काढून त्याची तयारी करावी, माझ्या प्रत्येक भेटीत मी हे बघणार आहे, शिक्षकांनी आपले विषयाचे ज्ञान अद्यावत ठेवावे, इंग्रजी, गणित व विज्ञान शिक्षकांची वेळोवेळी पडताळणी करण्यात येईल, विद्यार्थी गुणवत्तेशी कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, कामचुकार शिक्षकांवर निश्चितच कार्यवाही केली जाईल, शाळा सुरू होणेंपूर्वी सर्व शाळांची अंतर्बाह्य रंगरंगोटी करून घ्यावी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता गृह, शालेय परिसर हा स्वच्छ असावा, हा सर्व संदेश प्रत्येक शाळेपर्यंत जाऊ द्या असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम यांनी सुचवले.
उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना डायट प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी सांगितले की, NEP 2020 अंतर्गत निपुण भारत ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे शाळापूर्व तयारी मेळावे अत्यंत उपयुक्त असून नव्याने दाखल होणाऱ्या बालकांना पहिल्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. करिता पुढे तालुकास्तर व केंद्रस्तर प्रशिक्षण सुव्यस्थित होणे आवश्यक आहे त्यामुळे जिल्हास्तर प्रशिक्षणातून आपण समर्थपणे तयार व्हावे. जेणेकरून मागील दोन वर्षांप्रमाणे शाळापूर्व मेळावे शाळास्तरावर यावर्षीही आयोजित होतील.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता पूनम घुले यांनी समारोपीय मार्गदर्शनात FLN ची पायाभरणी ही या शाळापूर्व तयारी अभियानातून होत असते करिता शालास्तरावर मेळावे आयोजित करतांना FLN ची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून साहित्याची रचना करावी असे सांगितले.
कार्यशाळेला तज्ञ सुलभक म्हणून साधनव्यक्ती कु. उर्मिला वैद्य, वशिष्ठ खोब्रागडे, सुनिल ठाकूर, व प्रथम फौंडेशन चे प्रशांत तुरकने उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिव्याख्याता पूनम घुले, केंद्रप्रमुख निशा बोदले, नेवालाल हरदुले, यु. एम. बोपचे, समग्र शिक्षा प्रोग्रामर नितेश खंडेलवाल, तसेच सर्व तालुक्यातील दोन दोन विषय साधनव्यक्ती उपस्थित होते. प्रशिक्षणाचे संचालन विषय साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले तर आभार सुनील ठाकूर यांनी मानले.