वर्धा लोकसभा मतदारसंघ सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.67 टक्के मतदान,24 प्रतिनिधीचे भविष्य पेटीबंद ………

0
5
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे

दिनांक :-27 एप्रिल 2024

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत 56.67 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला काही मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची गर्दी दिसून आली. यात धामणगाव 53.58 टक्के, मोर्शी 57.60 टक्के, आर्वी 60.85 टक्के, देवळी 57.11 टक्के, हिंगणघाट 55.48 टक्के, वर्धा विधानसभा मतदारसंघात 56.06 टक्के मतदान झाले.

वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 16 लाख 82 हजार 771 मतदार असून त्यामध्ये 8 लाख 58 हजार 439 पुरूष तर 8 लाख 24 हजार 318 महिला असून 14 इतर मतदारांचा समावेश आहे. यापैकी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 5 लक्ष 9 हजार 83 पुरुष मतदारांनी (59.30 टक्के), 4 लक्ष 44 हजार 464 स्त्री मतदारांनी (53.92 टक्के) तर सहा इतर मतदारांनी (42.9 टक्के) असे 9 लक्ष 53 हजार 553 (56.67 टक्के) मतदारांनी मतदान केले.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी वर्धा लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

वर्धा लोकसभा मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाजेपर्यंत 56.67 टक्के मतदान झाले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापन मतदान केंद्र, युवा कर्मचारी व्यवस्थापन मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. इको फ्रेंडली मतदान केंद्र, क्यूलेस मतदान केंद्र, पिंक मतदार केंद्र, सेंच्यूरीयन मतदान केंद्र, रेनबो थीम मतदान केंद्र, क्यूलेस मतदान केंद्र मतदारांसाठी यावेळचे आकर्षण ठरले.