मा. ए.टी. वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांचे निर्णय
गोंदिया / धनराज भगत
दि २९/०४/२०२४ रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नामे निरंजन पुरूषोत्तम चवरे, वय ४१ वर्षे, व्यवसाय मजुरी, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया, यास १४ वर्षाचा सश्रम कारावास व ७,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरण असे की, दिनांक १०/०१/२०१८ चे सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत एका छोटयाशा गावातील घटना असून पिडिता कु. वय २४ वर्षे ही मतीमंद आहेत व ती आपल्या आईवडीलांसोबत राहात होती व तिचे आई वडील मजुरीच्या कामाला बाहेर जात होते. घटनेच्या दिवशी ती वरील तारखेला घरात एकटी असतांनी व तिचे आई वडील हे मजुरीच्या कामावर गेले असल्याचा फायदा वरील आरोपीने घेवून पिडितेच्या घरी जावून तिला बाथरूमध्ये घेवून जावून तिच्या अंगातील कपडे काढून तिच्यावर अतिप्रसंग केला होता. सदर घटनेवेळी पिडिता रडल्यामुळे शेजारी राहणा-या बाईने पाहिले असता व आरोपीला हटकले असता आरोपी तेथून पळून गेला. म्हणून सदर बाब साक्षदार महिलेने पिडितेच्या आई वडिलांना सांगितली. यावरून पिडितेच्या आईने दिनांक १०/०१/२०१८ रोजी पो.स्टे. अर्जुनी मोरगाव येथे आरोपी विरूध्द तकार दिली होती. यावरून आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (जे) (एल), ४५० भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून तत्कालीन तपासी अधिकारी अनिल कुंभरे, सहायक पोलीस निरिक्षक, पो.स्टे. अर्जुनी मोरगाव यांनी सदर प्रकरणाचा सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केंले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार/पिडित पक्षातर्फे सहा. सरकारी वकील वसंतकुमार एम. चुटे यांनी एकुण ७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.
एकंदरित आरोपीचे वकील व फिर्यादी/पिडीतेतर्फे सहा. सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांचे सविस्तर युक्तीवादानंतर मा. ए. टी. वानखेडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया जि. गोंदिया यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे निरंजन चवरे, वय ४१ वर्षे, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया, यांस
१) भारतीय दंड विधानाचे कलम ३७६ (२) (जे) (एल) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व रूपये ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास तसेच
२) भारतीय दंड विधानाचे कलम ४५० अंतर्गत ४ वर्षांचा सश्रम कारावास व रूपये २,०००/- दंड व दंड न भरल्यास २ महिन्याचा अतिरिक्त कारावास असा एकुण १४ वर्षाचा सश्रम कारावास व रूपये ७०००/- दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरणात पोलीस अधिक्षक मा. निखिल पिगंळे यांच्या मार्गदर्शनात व पैरवी कर्मचारी पो. हवा. कृष्णकुमार अंबुले पो.स्टे. अर्जुनी मोरगाव यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.

