सेवापूर्ती सत्कार व ‘धर्मरक्षित पर्व’ गुणगौरव ग्रंथाचे प्रकाशन
आमगाव / धनराज भगत
प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे हे प्राध्यापक ते प्राचार्य पदावर कार्यरत असताना केवळ नोकरीच केली नाही, तर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्णशिक्षण, होतकरू विद्यार्थ्यांना गरजेनुसार मदत व विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून परिसरात गुणवंत विद्यार्थ्यी घडविले व विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकिक केला. ते येवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सामाजिक, धार्मिक पत्रकारिता, साहित्य व सांस्कृतिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहील. त्यामुळे त्यांनी समाजाला दिशा दिली. ते केवळ एक प्राध्यापक व प्राचार्यच नव्हते, तर ते एक समाजशिक्षकही होते. त्यामुळे समाजाने त्यांचा आदर्श अंगी बाळगावा असे आवाहन प्राचार्य भाऊ वासनिक यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. येथील चंद्रा लाॅन येथे गोंदिया जिल्हा व आमगाव / सालेकसा तालुका शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे यांचा सेवापूर्ती सपत्निक सत्कार व ‘धर्मरक्षित पर्व’ या गुणगौरव ग्रंथाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊ वासनिक होते. सत्कारमूर्ती प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे , अनिता टेंभुर्णे ,प्रमुख पाहुणे म्हणून विद्या निकेतन वेल्फेअर संस्थेचे सचिव बबनसिंह ठाकूर, गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष व्ही.डी.मेश्राम, धर्मरक्षित पर्व या गुणगौरव ग्रंथाचे संपादक प्रा. ज्योतिक ढाले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष राजभूषण मेश्राम, भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष भरत वाघमारे, आमगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.झेड. एस. बोरकर, पोलीस बाॅईज संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विश्वजीत गणवीर, समता सैनिक दलाचे चीफ कमांडर आनंद बन्सोड उपस्थित होते. याप्रसंगी गोंदिया जिल्हा व आमगाव/ सालेकसा तालुका शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना, स्मारक समिती, लुंबिनी वन पर्यटन समिती, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, तालुका पत्रकार संघ, जयंती उत्सव समिती, पोलीस बाॅईज संघटना, बँक काॅलनी परिवार, मित्रपरिवार व आप्तेष्टांच्या वतीने प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे व अनिता टेंभुर्णे यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे सत्काराला उत्तर म्हणून विविध संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, पत्रकारिता, साहित्य व सांस्कृतिक कार्य केल्याचे सांगून सर्व संघटनांनी व समाजबांधवांनी सन्मान केल्याबद्दल सर्व संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार, समाजबांधव व चाहत्यांना त्यांनी ऋणमुक्तीचा संदेश दिला. याप्रसंगी प्राचार्य भाऊराव पत्रे, प्राचार्य व्ही.डी.मेश्राम, संस्थासचिव बबनसिंह ठाकूर, गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, प्रा.ज्योतिक ढाले, भरत वाघमारे, प्रा. प्रसेनजीत तेलंग, दिलिप मून, डाॅ. गुरुदास येडेवार, योगेश रामटेके यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ‘धर्मरक्षित पर्व’ या गुणगौरव ग्रंथाचे प्रकाशन व संमा स्मृती फाऊंडेशन स्थापनेची घोषणा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव योगेश रामटेके हे उत्कृट सामाजिक व धार्मिक कार्य करीत असल्याबद्दल यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे यांच्या सन्मानपत्राचे वाचन प्रा. दिनेश कोटांगले व प्रास्ताविक प्राचार्य व्ही.डी.मेश्राम यांनी केले. संचालन प्रा.मिलिंद रंगारी व मुख्याध्यापक रमण हुमे यांनी केले. प्राचार्य पालकराम वालदे यांनी आभार मानले.