डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती व जनजागृती करणे हा आहे. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्तटाय नावाच्या डासामुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये अंडी घालतात, त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठवलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेऊ नये.
सध्या उन्हाळा सुरु असल्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्यानुषंगाने साठविलेल्या पाण्यात एडिस डास अंडी घालतात. डेंग्यू हा अत्यंत गंभीर आजारापैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त होतात, तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणाही ठरतो. विशेषत: पावसाच्या सुरुवातीच्या काळात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. अशा परिस्थितीत लोकांनी डेंग्यू आजाराबाबत जागरुकता बाळगली पाहिजे.
16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांना या आजाराबद्दल जागरुक करणे आणि त्याची लक्षणे, कारणे आणि उपचाराबद्दल माहिती देणे. हा दिवस आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागरुकता असली तरी या आजाराला बळी पडतात. डेंग्यू या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याबाबत अचूक माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
डेंग्यू आजाराची कारणे : डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात.
डेंग्यू आजाराची लक्षणे : एडिस एजिप्टाय डासाचा संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्यूची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तश्रावात्मक ताप अशा दोन प्रकारे हा आजार पसरतो. डेंग्यू रक्तश्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून यामुळे मृत्यू सुध्दा ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरुपात असू शकते. याखेरीच एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, चव आणि भुक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या होतात. डेंग्यू ताप आजारात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दुखीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात, डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड यातून रक्तस्त्राव होतो. अशक्तपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
डेंग्यू आजार टाळण्यासाठी उपाय :ताप असेपर्यंत आराम करावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयाचा भरपूर उपयोग करावा. रक्तस्त्राव अथवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे. अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावे. मच्छरदाणी व क्रीमचा वापर करावा. साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत. खाली न करता येणाऱ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडावे. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर, डिस्पोजल इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी अथवा पातळ कपडा नेहमी बांधावा. आपल्या घराबाहेर पाणी साचू देऊ नका, घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. अंगणात व परिसरातील खड्डे बुझवावे, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावे. डेंग्यू तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिलेले आहे.
नागरिकांनी अशाप्रकारे दक्षता घेतल्यास डासांची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.