वादात मध्यस्थी करणे किती महागात पडू शकते, हे देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालयातील झालेल्या घटनेवरून देवरीकरांना अनुभवास आले. शाळा संस्थापक व शिक्षकाचा सुरू असलेला वाद शमविण्यासाठी पुढाकार घेणार्या लिपीकाला जीव गमवावा लागला. वादात मध्यस्थी करणार्या लिपीकालाच शिक्षकाने जब्बर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लिपीकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज (ता.१६) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. मुकूंद बागडे (६०) रा.मुल्ला असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे १५ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. दरम्यान संस्थेची सभा संपताच शिक्षक हिरालाल खोब्रागडे (५२) यांनी आपल्या समस्या उपस्थित करून संस्थापक असलेले मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांना धारेवर धरले. यावरून संस्थापक मेश्राम आणि शिक्षक खोब्रागडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. पाहता पाहता शाब्दीक वाद विकोपाला गेला. तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, असा आरोप करीत शिक्षक खोब्रागडे यांनी मुख्याध्यापकांवर हल्लाबोल केला.
वाद वाढत असल्याचे पाहून मृतक मुकूंद बागडे हा समजुत घालण्याच्या उद्देशाने मध्यस्थीसाठी गेला. मात्र खोब्रागडे यांनी रागाच्या भरात मुख्याध्यापकांना सोडून मृतकाला जबर मारहाण केली. या घटनेत मुकूंद बागडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच बेशुध्द होवून पडले. बेशुध्द अवस्थेतच बागडे यांना उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु, आज, १६ रोजी पहाटे ३ वाजतादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहे.