ब्रेकिंग: सोनेगाव येथे शेतशिवारात मजुरांना वाघाचे दर्शन.. वन विभाग पोलीस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल..

0
127

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

तुमसर तालुक्यातील सोनेगाव येथे आज दिनांक 17 मे रोजी सकाळी 8 वाजता धान पिकाची कापणीसाठी गेलेल्या महिला मजुरांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यावेळी महिला मजुरांनी शेतातून काढता पाय घेतला. सध्या सिहोरा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकाची कापणी सुरू असून सोनेगाव येथील शेतकरी मनलाल चव्हाण यांच्या शेतात काही महिला मजूर धान कापणीसाठी गेले असता त्यांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यावेळी महिलांनी जीव मुठीत घेऊन शेतातून पळ काढला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी वाघ बघण्यासाठी शेतात मोठी गर्दी केली. दरम्यान घटनेची माहिती वनविभाग व व पोलीस विभागांना मिळताच तुमसर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले, वनरक्षक डी. ए. काहुडकर, आर.ओ. डेहनकर, वनरक्षक एच. एम. आहाके, आर.डी.चौधरी, ए. जे. वासनिक, ए. एस. सेलोकर तसेच सिहोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी वाघाचे शोधमोहीम सुरू असताना त्यांना शेतात वाघाचे पगमार्क आढळले. दरम्यान नागरिकांचा आरडाओरडा ऐकून शेतात लपलेल्या वाघाने शेताजवळील नाल्यात पळ काढला असून त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग व पोलीस विभागातील कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. दरम्यान त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी भंडारा येथील आर. आर. टी. पथकाला पाचरण केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले यांनी दिली आहे.

Previous articleधक्कादायक..! शिक्षकाने केली लिपिकाची हत्या….
Next articleधक्कादायक : एकाच रात्री फोडली पाच दुकाने…