धक्कादायक : एकाच रात्री फोडली पाच दुकाने…

0
107
1

तिरोडा येथे व्यापाऱ्यांमध्ये पसरली प्रचंड दहशत

गोंदिया / धनराज भगत

तिरोडा शहरातील बाजार परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले पाच दुकानांमध्ये शटर वाकवून चोरी करण्यात आली. यात एक ज्वेलरी दुकान, तीन किराणा व एक मेडिकल स्टोअरचा समावेश आहे.
तिरोडा शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री शहरात पाच ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी एकूण २०,४०० रुपयांचा माल लंपास केला आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील पोलिस स्टेशनपासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या बाजारातील पाच दुकानांचे शटर वाकवून चोरी केली आहे. यात गंज बाजार परिसरात संजय मोटवानी यांचे किराणा दुकान, संत कवाराम वॉर्ड येथील मनोहर छतानी, धनराज सेवकराम छतानी, तनुमल सेवकराम छत्तानी तसेच विजय द्वारकाजी येरपुडे यांच्या दुकानांमध्ये चोरीचे प्रकार घडले. सर्वच ठिकाणी शटर वाकवून दुकानात प्रवेश केल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोर येऊन चोरी करून जाताना दिसत आहेत. यावरून हे सर्व एकाच टोळीचे कृत्य असावे असा अंदाज आहे.

संपूर्ण शहरात कॅमेरे, तरीही टोळी सक्रिय

 तिरोडा शहरात जागोजागी १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तरीही शहरात चोरांची टोळी सक्रिय असून पोलिसांच्या डोळ्यादेखत वेगवेगळ्या भागात चोरी करत आहेत. हे पोलिसांसाठी आव्हान असून चोरीच्या घटनांमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शहरातील व्यापारी संघटनेने पोलिस निरीक्षक देविदास कठाळे यांना निवेदन देऊन चोट्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

हे सर्व चोरीचे प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहेत. चोरी झालेली सर्व दुकाने पोलिस स्टेशनपासून काही मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे पोलिसांच्या रात्री गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच ठिकाणी चोरी होऊनही ही बाब पोलिसांच्या निदर्शनात कशी आली नाही ❓ असा प्रश्न नागरिकांना व व्यापारी मंडळीला पडला आहे.

साभार: सकाळ