वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
दिनांक :-19 मे 2024
बुटीबोरी-तुळजापूर महामार्ग अडवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.
प्रवाश्यांच्या गैरसोयीबाबत युवा संघर्ष मोर्चाचा एसटी महामंडळाला निर्वाणीचा इशारा.
प्रत्येक बसेसचा थांबा देण्याची मागणी.
देवळी:
मागील काही महिन्यांपासून प्रत्येक विभागाच्या अनेक लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या बसेस देवळी बसस्थानकावर न येता परस्पर बायपासने जात असल्याच्या घटना राजरोसपणे सुरू आहे. देवळी हे तालुक्याचे ठिकाण असून देवळी शहर हे नागपूर-तुळजापूर या प्रमुख मार्गावर वसलेले शहर आहे. देवळी हे जवळपास ३० हजार लोकसंख्येचे शहर असून या ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत सुद्धा आहे. या ठिकाणी शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली आहे. देवळी शहर व तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणाकरिता वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,पुणे इ. ठिकाणी नेहमीच ये-जा करीत असतात. तसेच देवळी शहरातील अनेक नागरिक नौकरी व व्यवसायाकरिता वर्धा, नागपूर, यवतमाळ याठिकाणी दररोज ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांचे आप्तजन वेगवेगळ्या शहरात राहत असल्याने महिला, लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना गोंदिया ते पंढरपूर प्रवास करावा लागतो. मध्यमवर्गीयांचे सर्वात सोयीचे साधन म्हणून नागरिक लालपरी कडे बघतात. मात्र चालक व वाहकांच्या हेकेखोरपणामुळे प्रवाश्यांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागपूर-तुळजापूर महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांचे चालक वाहक देवळी बसस्थानकावरील थांबा नाकारत असतात. त्याहीपेक्षा देवळी च्या प्रवाश्यांना देवळी करीता प्रवासच नाकारल्याच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. अनेकदा रात्री-अपरात्री महिला, लहान मुले, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरिकांना देवळी शहरापासून दोन ते तीन किलोमीटर लांब बायपासला उतरवून दिल्याच्या गंभीर घटना घडल्या आहे. या गंभीर घटना अजूनही दररोज घडत आहे. सदर प्रत्येक घटनेबाबत युवा संघर्ष मोर्चाने अनेक तक्रारी विभागीय वाहतूक नियंत्रक, वर्धा यांना केलेल्या आहे. या प्रकारामुळे वृद्ध प्रवासी, महिला प्रवासी, विद्यार्थीनी, लहान मुलांचे प्रचंड हाल होत असून त्यांना चालक-वाहकाकडून वेठीस धरले जात आहे. बसेस बायपासने जात असल्याने प्रवाश्यांना देवळी बसस्थानकावर तासनतास बसेसची वाट पहावी लागत आहे. यामध्ये चालक वाहकांचे प्रवाशांसोबत गैरवर्तनाचे प्रकार सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकारामुळे एस.टी. महामंडळाविरुद्ध नागरिकांमध्ये भयंकर चीड निर्माण झाली आहे. युवा संघर्ष मोर्चा अनेक महिन्यापासून सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करीत आहे. परंतु या प्रकारावर कुठलीही हालचाल होत नसल्याने युवा संघर्ष मोर्चाने विभागीय नियंत्रक संजय रायलवार यांना निवेदन दिले. त्यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचत येत्या १५ दिवसामध्ये प्रत्येक बसेसचा थांबा देवळी बसस्थानकावर बंधनकारक करावा. देवळी बसस्थानकावर प्रत्येक बसेसला थांबा न दिल्यास बुटीबोरी-तुळजापूर महामार्ग अडवून तीव्र आंदोलनाचा इशारा युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर,ऍड मंगेश घुंगरूड, समीर सारजे, संदीप दिघीकर, सत्तार शेख, मनोज नागपुरे, मंगेश वानखेडे, स्वप्नील मदनकर,दिनेश दिघाडे, मनीष पेटकर, विनय महाजन, अमोल भोयर, अविनाश धुर्वे, शरद भोयर, मुज्जफर शेख, सागर पाटणकर, रोहित राठोड, गौरव खोपाळ व नागरिकांची उपस्थिती होती.

