
1



गडचिरोलीत नेतेंची हॅटट्रिक की डॉ. किरसान यांना पहिल्यांदा संधी ..!
गडचिरोली : २००९ मध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेला गडचिरोली- चिमूर लोकसभ मतदारसंघातील मतदारांचे मतांचे दान यंदा महाविकास इंडिया आघाडीचे डॉ. नामदेव किरसान यांना मिळणार, की महायुतीचे अशोक नेते यांच्या पदरात पडणार याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. सलग दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले अशोक नेते तिसरा विजय प्राप्त करत हॅटट्रिक करतील की अद्याप आमदारही न झालेले डॉ. नामदेव किरसान खासदार होतील, यावर पैजा लावल्या जात आहेत.
एक देवदर्शनात, दुसरे आभार मानण्यात व्यस्त
■ गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात १० उमेदवार असले, तरी महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे डॉ. नामदेव किरसान यांच्यातच खरी लढत आहे. निवडणुकीनंतर अशोक नेते देवदर्शनात व्यस्त झाले. मतदान आटोपल्यावर ते शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला गेले होते. नुकतीच त्यांनी वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे संत भोजाजी महाराज मठाला भेट देत येथे आपल्या विजयासाठी प्रार्थना केली. दुसरीकडे डॉ. किरसान मात्र पक्षाचे कार्यकर्ते, मतदारांच्या भेटी घेत त्यांचे आभार मानताना दिसत आहेत.
पूर्वी खुल्या असलेल्या या मतदरसंघाचे रूपांतर अनुसूचित
जमातीसाठी राखीव झाल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडे उमेदवारीचे मर्यादित पर्याय शिल्लक राहिले. २००९ मध्ये कॉंग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी अशोक नेते यांचा पराभव करून विजय प्राप्त केला होता.
पण पुढच्या २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसने माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी नावाचा कमजोर उमेदवार दिल्याने या दोन्ही निवडणुका अशोक नेते यांनी सहज जिंकल्या आणि सलग दोनदा खासदार झाले. गंमत म्हणजे अशोक नेते यांच्याकडून दोनदा सपाटून मार खाणारे डॉ. उसेंडी यंदाच्या २०२४च्या निवडणुकीत काँग्रेसचा त्याग करून भाजपवासी होत नेते यांचाच प्रचार करत होते. काँग्रेसच्या एका नामदेवाला दोनदा चारी मुंड्या चित करून अशोक नेते यांनी त्यांना आपल्या भाजप पक्षातसुद्धा आणण्याची किमया केली. पण त्यांच्या विरोधात यंदा काँग्रेसचे आणखी एक नामदेवच उभे ठाकलें आहे. हे नवे डॉ. नामदेव किरसान अतिशय परिश्रमी असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. शिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रचार केला. सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा क्षेत्रात पूर्वी काँग्रेसचाच वरचष्मा होता. पण काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत सलग, दोन टर्म हे क्षेत्र भाजपने आपल्याकडे ठेवले.
■ मिलिंद उमरे: सकाळ वृत्तसेवा


